धुळ्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बनावट ‘इम्पेरिअल ब्ल्यू’ दारुचा कारखाना नष्ट

एक लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त : बनावट दारू पोलिसांच्या रडारवर


Major Operation by Crime Branch in Dhule : Factory Producing Counterfeit ‘Imperial Blue’ Liquor Dismantled धुळे (9 एप्रिल 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे बनावट दारुच्या कारखान्यावर कारवाई करीत एक लाख 43 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने बनावट दारू बनवणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. आरोपी स्पिरीट व विशिष्ट रसायनांद्वारे ‘इम्पेरिअल ब्ल्यू’ नावाची दारू बनवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना धुळे शहरातील अंबिका नगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक बनावट दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह गुरुवार, 9 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री या ठिकाणी छापा टाकला. यावेळी रवींद्र रमेश महाजन (27, रा.दसरा मैदान, धुळे) हा आपल्या साथीदारासह मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशी बनावट दारू तयार करताना रंगेहाथ गवसला.


एक लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त
बनावट दारुच्या कारखान्यात बनावट दारूच्या 1152, 500 लिटरची पाण्याची टाकी, प्लास्टिक ट्रे, मोजमाप साधन, नऊ हजार बनावट स्टिकर्स, प्लास्टिकचे बुच आणि रिकाम्या बाटल्या तसेच दारूला रंग आणि चव देण्यासाठी वापरण्यात येणारी गडद चॉकलेटी रंगाची रसायने, 200 लिटर स्पिरिट आणि अल्कोहोल मीटर आदी मिळून एक लाख 43 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, अंमलदार पवन गवळी, सचिन गोमसाळे, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, आरीफ पठाण, मयूर पाटील आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !