साकेगाव ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा बंद ; पाणीपुरवठ्यावर परिणाम
भुसावळ (9 एप्रिल 2026) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील वीज कंपनीने गेल्या 20 दिवसापासून साकेगाव येथील वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामपंचायतीने वीज बिल भरून हा वीजपुरवठा अद्यापही सुरळीत केला नसल्याने त्याचा परिणाम साकेगाव गावाच्या व भुसावळच्या हद्दीबाहेरील परिसरावर झाला आहे. या संदर्भात नगरसेवक दीपक धांडे यांनी प्रशासनाला निवेदन देत दखल घेण्याची मागणी केली आहे.
तर सेनास्टाईल आंदोलन
दीपक धांडे यांच्या निवेदनानुसार भुसावळ हद्दीबाहेरील गोदावरी नगर, स्वामी विहार, भाग्यश्री विहार, मोरेश्वर नगर, सीताराम नगर, महालक्ष्मी नगर व इतर भागातील जवळ जवळ एक लाखांवरील लोकवस्तीत पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. गावातील काही भागातील वीज बंद पडली आहे. साकेगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे आपण स्वतः लक्ष घालून त्याचप्रमाणे आपण वीज कंपनीशी बोलून येथील विजेचा प्रश्न सोडवावा व समस्या न सुटल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दीपक धांडे यांनी दिला आहे.







