भुसावळ बसस्थानक ते वरणगाव रोड ‘खड्ड्यात’
भुसावळ (11 एप्रिल 2026) : भुसावळ शहरातील पंधरा बंगला ते वाय पॉइंट या मार्गावर तर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून संबंधत विभागाने या रस्त्याची सहा वर्षांपासून एक वेळाही दुरुस्ती केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
रस्ता मोजतोय अखेरची घटीका
शहरातील बसस्थानक ते वरणगाव वाय पॉइंट महामार्गाला जोडणारा वरणगाव रोड आता अखेरची घटका मोजत आहे. अकोले धर्मशाळा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज नगर भाग, बस डेपो परिसर, पंधरा बंगला ते वाय पॉइंट सुंदरनगर पर्यंतचा रस्ता खिळखिळा झाला आहे. या मार्गांवर तब्बल एक फूट खोल व पाच ते सहा फूट रुंद खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन सुंदर नगर, तनारिका हॉटेल परिसर, साकरी फाटा, गोलाणी काँम्पलेक्स, साकरी मार्गावरील सर्व विस्तारीत भागांना शहरात यावे लागते. खड्डेमय व अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यातून अपघात होऊ शकतो.

बसेस समोर आल्यास वाहतुकीचा खोळंबा
गार्डलाइन रस्ता बंदने अडचणी वरणगाव रोड हा अरुंद मार्ग आहे. मात्र, त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरु आहे. तीन चाकी व चारचाकी वाहनांसाठी गार्ड लाइनचा रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे वरणगाव रोडवरील वाहतुकीचा भार वाढला. छत्रपती शिवाजीनगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या अरुंद रस्त्यावर दोन बसेस समोरासमोर आल्या तरी वाहतुकीचा खोळंबा होतो. वरणगाव रोडवर असे जीवघेणे खड्डे पडले आहेत.






