जळगावातील परफ्यूम विक्रेत्याला एक लाख 21 हजारांचा गंडा
Jalgaon Perfume Seller Duped of ₹1.21 Lakhs जळगाव (11 एप्रिल 2026) : जळगावातील परफ्यूम विक्रेत्याला विविध ऑडर्स देण्याच्या नावाखाली एक लाख 21 हजार 283 रुपयांचा गंडा घालण्यात आला. भामट्याने वेगवेगळ्या नावांनी आणि मोबाईल क्रमांकांनी बनावट ऑर्डर्स नोंदवून ‘रेझर-पे’ पेमेंट गेटवेचा गैरवापर करत ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी झाली फसवणूक
विशाल विनोद जवाहरानी (26, रा. आदर्श नगर) यांचे फुले मार्केटमध्ये ‘परफ्युम्स बाय जनता शॉपी’ नावाचे दुकान आहे. ते आपल्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन परफ्युम विक्रीचा व्यवसाय करतात. संशयित आरोपी रवी कुमार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने 29 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत विशाल यांच्या वेबसाईटवरून वारंवार वेगवेगळ्या नावांनी आणि ई-मेल आयडीचा वापर करून ऑर्डर्स दिल्या.

रक्कम होल्ड करीत केली फसवणूक
विशाल जवाहरानी यांनी या ऑर्डर्सनुसार कुरियरद्वारे पार्सल पाठवले. मात्र संशयित आरोपीने अतिशय चलाखीने ‘रेझर-पे’द्वारे केलेले पेमेंट परत मिळवण्यासाठी संबंधित बँकांकडे खोट्या तक्रारी केल्याने बँकांनी ही रक्कम विशाल जवाहरानी यांना न देता ‘होल्ड’ करून ठेवली. अशा प्रकारे आरोपीने परफ्युमचे पार्सलही मिळवले आणि भरलेली रक्कमही गोठवून व्यापार्याची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत.






