नायगाव-किनगाव रस्त्यावर सागवान लाकडाच्या पाट्या वाहुन नेणारे वाहन पकडले
A vehicle transporting teak wood planks was intercepted on the Naigaon-Kingaon road. यावल (13 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील पश्चिम वनपरिक्षेत्र विभागाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत विनापरवाना सागवान लाकडाच्या पाटयांची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडले. या कारवाई दरम्यान वाहन-चालक वाहन सोडून पसार झाला. वनविभागाने सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सापळा रचून कारवाई
वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे नायगाव-किनगाव रस्त्यावर शनिवारी रात्री सुमारे 10 वाजता सापळा रचण्यात आला होता. यावेळी संशयित हालचालींवर लक्ष ठेवताना महिंद्रा पिकअप (क्रमांक एम.एच.04 ई.एल.7658) या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान प्लास्टिक क्रेटच्या खाली लपवून ठेवलेल्या सागवान लाकडाच्या चौपाट पाट्या आढळून आल्या. एकूण 0.177 घनमीटर सागवान लाकूड, ज्याची किंमत 3,939 रुपये आहे, असे आढळले. या कारवाईत संबंधित वाहनाची किंमत 5,25,000 रुपये असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत पाच लाख 28 हजार 939 रुपये इतकी आहे. या कारवाई तरम्यान चालक तेथून वाहन सोडून पळून गेला.

वनविभागाने वाहनासह संपूर्ण मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून यावल येथील वन उपज केंद्रात जमा केले आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41 (2) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.







