ईको कार-सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण अपघात : 11 प्रवासी ठार
Horrific Accident Involving Eeco Car and Cement Mixer Truck : 11 Passengers Killed मुंबई (13 एप्रिल 2026) : ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण अपघात घडल्यानंतर या अपघातात तब्बल 11 प्रवाशी ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये आठ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.
असा घडला अपघात
कल्याण-नगर मार्गावर सोमवारी सकाळी एक ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने 11 प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी न मिळाल्याने ते जागीच गतप्राण झाले. या अपघात अन्य दोन जणही गंभीर जखमी झाले. त्यांना लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


असा घडला अपघात ?
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील गोविली गावालगतच्या रायता पुलावर सोमवारी सकाळी 10.45 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त ईको कार कल्याण ते मुरबाड अशी प्रवाशी वाहतूक करते. ती सोमवारी सकाळी प्रवाशी घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघाली होती. अपघात घडला तेव्हा त्यात चालकासह 11 ते 12 जण प्रवास करत होते. या कारला समोरून येणार्या भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक झाली. त्यात कारमधील एकाही व्यक्तीला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न
या भीषण अपघातामध्ये ठार झालेल्या सहा जणांची ओळख आतापर्यंत पटली आहे. उर्वरित पाच जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. या अपघातामुळे कल्याण – नगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरुळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सर्वच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवलेत.
परिवहन मंत्र्यांकडून निवेदन जारी
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अपघाताबाबत निवेदन जारी करताना म्हणाले की, सोमवार, 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास कल्याण – मुरबाड – माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र.एम.एच.05 जी.0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र.एम.एच.12 टीव्ही 3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात ओम्नी कारमधील 11 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे.








