हवामान विभागाचा पहिला अधिकृत अंदाज ; यंदा ‘सरासरीपेक्षा कमी’ पाऊस
Meteorological Department’s First Official Forecast : ‘Below Average’ Rainfall This Year मुंबई (13 एप्रिल 2026) : भारतीय हवामान विभागाने सोमवारी देशातील 2026 मधील पावसाचा अधिकृतरित्या अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून हे प्रमाण ‘सामान्य पेक्षा कमी’ या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
‘एल निनो’ चे पावसावर सावट
यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’ या हवामान स्थितीचे सावट राहण्याची शक्यता आहे. डॉ.मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या काळात ‘एल निनो’ची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती असते. दिलासादायक बाब म्हणजे, याच काळात हिंदी महासागरात ‘इंडियन ओशन डायपोल’ सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. हा सकारात्मक आयओडी ‘एल निनो’च्या नकारात्मक प्रभावाला रोखण्यास मदत करतो, त्यामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते. जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती सुरुवातीला सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.


तर पाणीसाठ्यावर होणार परिणाम?
खाजगी हवामान संस्थांनी यापूर्वीच मान्सून कमकुवत राहण्याचे संकेत दिले होते, त्यावर आता सरकारी मोहोर उमटली आहे. पावसाचे प्रमाण 92 टक्के राहिल्यास शेतीकामांचे नियोजन, पेरण्या आणि पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असल्याने, हा अंदाज धोरणकर्त्यांसाठी आणि शेतकर्यांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.








