जळगाव खून प्रकरण : दोघा आरोपींना अटक
जळगाव : शहरातील मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित यांच्या खून प्रकरणी दोघा आरोपींना पहूरजवळून अटक करण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. उधारीच्या पैशातून वाद झाल्याने मयताचा काटा काढला असल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (सब जेलमागे,जळगाव) व सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
हॉटेलमध्ये पडली वादाची ठिणगी
शनिवारी रात्री भजे गल्लीतील हॉटेल रीगल पॅलेसमध्ये मयत घनशाम शांताराम दिक्षीत व सुधीर महाले हे दोघे बसले असताना शेजारच्या टेबलावर मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (सब जेलमागे,जळगाव) हा सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रामेश्वर कॉलनी, जळगाव) सह मित्रासोबत दारू पित होता. यावेळी आरोपींनी मयताकडे लायटींग कामाचे दहा हजार रुपये मागितल्याने उभयतांमध्ये वाद झाला व रात्री मयताच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. मारहाण केल्यास 307 चा गुन्हा दाखल होईल मात्र खून केल्यास 302 चा गुन्हा दाखल होवून वट वाढेल म्हणून हे कृत्य केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, सहा.फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, मनोज सुरवाडे, हेमंत कळसकर, किशोर पाटील, निलेश पाटील, प्रविण मांडोळे, गोविंदा पाटील, सचिन पाटील आदींनी जळगाव-औरंगाबाद रोडवर भवानी फाटा, पहुर पाळधी गावाजवळून आरोपींच्या जंगलात पाठलाग करून मुसक्या आवळल्या.