धुळ्यात ट्रक चालकाला लुटणार्या पाच आरोपींना सात वर्ष शिक्षा
धुळे न्यायालयाचा निकाल : प्रत्येक आरोपीला सुनावला पाच हजारांचा दंड
धुळे : ट्रक चालकाला शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण करणार्या पाच दरोडेखोरांना धुळे न्यायालयाचे न्या.ओगले यांनी सात वर्ष शिक्षा व प्रत्येकी पाच हजारांचा दंड सुनावला आहे. 30 डिसेंबर 2016 रोजी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रोडवरील वरखेडी पुलाजवळ पाच दरोडेखोर ट्रक चालक मारहाण करून लुटत असल्याची माहिती आझाद नगर पोलिसांना कळाल्यानंतर ठाणे अंमलदाराने तत्कालनी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव व पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांना कळवली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक उगले, पोलीस अंमलदार अरुण चव्हाण, कुणाल पानपाटील, मनोज बागूल, दगडू कोळी, डी.आर.सुर्यवंशी आदींनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालक व क्लिनरला मारहाण करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार व धुळे शहरातील हद्दपार आरोपी राहुल उर्फ टाल्या थोरात यास पकडले होते तर अन्य साथीदार पसार झाल्यानंतर नंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
साडेतीन वर्ष चालले खटल्याचे कामकाज
शहरालगत असलेल्या वरखेडी उड्डाणपूल परीरसरात पोल्ट्रीफॉर्म मधील कोंबडीचे पिल्ले घेऊन जाणार्या वाहनास पाच संशयितांनी अडवत मारहाण केल्याची घटना 30 डिसेंबर 2016 रोजी घडली होती. याप्रकरणी वाहनचालक शरद भिला हेमाडे यांनी आझाद नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून टाल्या उर्फ राहुल गजानन थोरात, मयूर सुरेश कंडारे, सागर चिंतामण भोई, महेश प्रकाश पवार व संतोष चंद्रकांत शिंदे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होता. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून आपणास मारहाण करत 25 हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावली तसेच वाहनातील सहचालक समाधान पाटील यास मारहाण करत त्याच्याकडील दोनशे रुपये हिसकावत असताना हाणामारीत नोट फाटल्याने अर्धा तुकडा घेत संशयित पसार झाल्याचे तक्रारीत नमूद होते. तब्बल साडे तीन वर्षे अंडर ट्रायल चाललेल्या या गुन्ह्यात घटनास्थळावरील साक्षीदार तसेच इतर विविध साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने प्रत्येक आरोपीला सात वर्ष सश्रम कारावासासाची तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे कामकाज विधी अधिकारी म्हणून निलेश कलाल यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार वाल्मिक पाटील यांनी काम पाहिले.