भुसावळ विधानसभेचे तिकीट विद्यमान आमदार संजय सावकारेंनाच मिळणार ?


कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह : विद्यमान आमदारांसह सहा इच्छुकांनी दिल्या मुलाखती

जळगाव : जिल्ह्यातील 11 मतदारसंघासाठी रविवारी भाजपा कोअर कमिटीसमोर तब्बल 164 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यात सर्वाधिक चाळीसगावातून 35 तर भुसावळातून सहा इच्छूकांनी मुलाखती दिल्याचे समजते. राज्याचे उर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावर यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. भुसावळ विधानसभेसाठी विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासह डॉ.मधू मानवतवर व अन्य इच्छूकांनी आपल्या मुलाखती दिल्या.

सावकारेंनाच उमेदवारी मिळणार असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा
भुसावळ विधानसभेचे तिकीट कुणाला मिळणार? याबाबत सोशल मिडीयावर चर्चा झडल्या असल्यातरी विद्यमान आमदार संजय सावकारे यांनाच तिकीट मिळणार असल्याची आशा भाजपापेयी असलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांना आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या विराट सभेतही मुख्यमंत्र्यांनी नामदार जावळे, माजी मंत्री खडसे, आमदार सावकारे यांचा हात हातात घेवून यांना मतदारांनाच कौल विचारत भाजपाला मत देणार का? असा प्रश्‍न विचारत कौल जाणून घेतला त्यामुळे सावकारे हेच भुसावळ विधानसभेचे उमेदवार असतील, असे राजकीय गोटातून बोलले जात आहे.

तर सावकारेंना तिसर्‍यांदा मिळणार संधी
आमदार सावकारे सुरुवातीला राष्ट्रवादीच्या व नंतर भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. आता भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्यास सलग तिसर्‍यांदा ते जनतेपुढे जाणार आहेत. शांत मितभाषी व सुशिक्षीत व्यक्तिमत्व असलेल्या सावकारे यांनी शहरातील अतिरीक्त सत्र न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर, क्रीडा संकुल, अतिरीक्त सत्र न्यायालयात दोन मजल्यांना मंजुरी यासह तालुक्यात विविध विकासाची कामे केली आहेत तर नुकतीच तालुक्यात कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पक्षश्रेष्ठी आमदारांना पुन्हा संधी देतील, असा कार्यकर्त्यांना विश्‍वास आहे. दरम्यान, भुसावळातून इच्छुकांची संख्या प्रचंड असलीतरी तिकीट नेमके द्यायचे कुणाला हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठ घेत असल्याने निर्णयाकडे लक्ष लागले आहे.


कॉपी करू नका.