नवापूर तालुका कृषी कार्यालयातील तंत्रज्ञान व्यवस्थापक एसीबीच्या जाळ्यात


आठ हजार 750 रुपयांची लाच भोवली : नंदुरबार एसीबीची कारवाई

नंदुरबार : नवापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कंत्राटी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक योगेश वामनराव भामरे (38) यांना आठ हजार 750 रुपयांची लाच घेताना नंदुरबार एसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

शेतकर्‍याने दिली तक्रार
नवापूर तालुक्यातील पिंप्रानच्या 35 वर्षीय शेतकर्‍याने दिलेल्या तक्रारीनुसार शेतकरी गटासाठी शासनामार्फत मोफत बी बियाणे व खते देण्याची योजना आहे. त्यासाठी शेतकरी एकत्र येऊन गट स्थापन करून कायदेशीर रजिस्ट्रेशन करून त्याची यादी उत्पादक कंपनी यांना सादर केली जाते व सदर कंपनी जिल्हा पातळीवर तालुका कृषी अधिकारी, नंदुरबार यांच्याकडे बी-बियाणे निविष्ठांची मागणी करतात. संबंधित कार्यालयाकडून तालुका पातळीवर आत्मा प्रकल्प कार्यालयाकडे वाटपासाठी पाठवले जाते. त्याप्रमाणे नमूद गटात असलेल्या यादीतील लोकांना बी बियाणे व निविष्ठा मोफत मिळतात. यातील तक्रारदार यांनी समृद्धी शेती उत्पादक गट पिंपरान, पोस्ट पोटीबेडकी, नवापूर, जि.नंदुरबार असा एकूण 16 शेतकर्‍यांचा गट कायदेशीर स्थापन करून रजिस्टर केला. तक्रारदार हे नमूद गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या गटास बी बियाणे निविष्टा शासनाकडून मोफत वाटप झालेले आहे व शेतात पेरणीदेखील झाली आहे. आत्मा प्रकल्प कार्यालय, नवापूर येथील लोकसेवक योगेश वामनराव भामरे यांनी सात दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्याकडे सर्व 16 शेतकरी यांचे प्रत्येकी 250 प्रमाणे मिळून चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती व लाच न दिल्यास पुढील रब्बी सिजनमधील पिकांचे बी बियाणे मोफत मिळू देणार नाही, असे सांगितले होते. तक्रारदार यांनी तक्रार दिल्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 16 शेतकरी नसून 35 शेतकरी आहेत, असे सांगून प्रत्येकी 250 प्रमाणे एकूण आठ हजार 750 लाचेची मागणी पंच व साक्षीदार यांच्या समक्ष करून ती लाच पंच व साक्षीदारांसमक्ष नवापूर स्टेट बँक ऑफ इंडिया रोड वरील सार्वजनिक रस्त्यावर स्वीकारताच अटक करण्यात आली.






यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, उत्तम महाजन , संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे अमोल मराठे, योती पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !