नंदुरबार एस.टी.आगाराचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
एस.टी.चालकाकडून वैद्यकीय बिलाच्या फाईल मंजुरीसाठी स्वीकारली चार हजारांची लाच
नंदुरबार : एस.टी.महामंडळातील चालकाची वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरीसाठी चार हजारांची मागणार्या करणार्या नंदुरबार एस.टी.आगारातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोजम अली खान (75, रा.नंदुरबार) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री लाच घेताच रंगेहाथ अटक केल्याने एस.टी.च्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अन् कंत्राटी वैद्यकीय अधिकारी अडकला जाळ्यात
नंदुरबार एस.टी.आगारात 55 वर्षीय तक्रारदार चालकास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात आली व त्यापोटी एकूण तीन लाखांच्या आसपास खर्च आला. त्याबाबतचे बिल एस.टी.महामंडळाकडून मंजूर होण्यासाठी फाइल तयार करून नंदुरबार एस.टी.महामंडळाद्वारे नियुक्त केलेले गाझीनगर, नंदुरबार येथील कंत्राटी डॉ.मोजम अली खान यांच्याकडे मे 2020 मध्ये पडताळणीसाठी फाइल सादर करण्यात आली व नंतर ही फाईल विभागीय कार्यालय, धुळे येथे पाठवल्यावर तेथून त्रृटींवर परत आली त्या त्रृटींची पूर्तता करून फाईल डॉ.खान यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात तक्रारदाराने दिली होती. डॉ.खान यांनी फाईल मंजुरीसाठी 29 ऑक्टोबर 2020 रोजी चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती व 2 नोव्हेंबर रोजी गाझीनगर येथील दवाखान्यात पंचासमक्ष लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.





