यावलमध्ये साडेपाच लाखांची अवैध दारू जप्त


नाकाबंदी दरम्यान कारवाई ; टेम्पो चालकास पोलिसांकडून अटक

यावल- भुसावळ टी पॉईंटवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत अवैधरीत्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला. या वाहनातून तब्बल पाच लाख 46 हजार 180 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवार, 2 रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी टेम्पो चालकास अटक करण्यात आली.

संशय आल्याने वाहन जप्त
शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भुसावळ टी पॉईंटवर कॉन्स्टेबल संदीप छगन भोई व नाईक सिकंदर रमजान तडवी हे नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी करत असतांना छोटाहत्ती गाडी (क्रमांक एम.एच.04 एफ.पी.4590) ही चोपड्याकडून फैजपूरकडे जात असताना थांबवल्यानंतर चालक अनुराग अजय श्रीवास्तव वाहनात काय सामान आहे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी-विदेशी दारू आढळली. दारू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याने हे वाहन जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. देशी-विदेशी दारू व एक लाख रुपयाचा टेम्पो असा एकूण पाच लाख 46 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास यावलचे पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व पोलिस कर्मचारी करीत आहेत.


कॉपी करू नका.