उत्सवादरम्यान वीज खंडित केल्यास आंदोलन उभारणार


प्रा.धीरज पाटील यांचा इशारा : चुकीची देयके मिळालेल्या ग्राहकांनी वीज बिल न भरण्याचे आवाहन

भुसावळ : चुकीचे देयके ज्या वीज ग्राहकांना मिळाली असतील त्यांनी ती भरू नये, अश्या ग्राहकांची वीज कर्मचारी वीज खंडित करण्यासाठी आले तर शिवसैनिकांशी संपर्क साधावा, सण-उत्सवादरम्यान वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रा.धीरज पाटील यांनी दिला आहे. भुसावळ तालुक्यातील सुमारे 18 हजार ग्राहकांना सरासरी देयक देण्यात आले असून एक हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना चुकीचे वीज बिल मिळाल्याने ते दररोज महावितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत असल्याचे प्रा.पाटील यांनी कळवले आहे.

महावितरण कार्यालयाभोवती ग्राहकांच्या चकरा
शहरातील शारदा नगरातील गिरीष महाजन (11775609430) या एकाच ग्राहकाला त्याच ग्राहक क्रमांकावर मागच्या चार महिन्यात तीन वेगवेगळ्या मीटर नंबरची 50 हजार 180 रुपयांची देयक देण्यात आले. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना मानसीकरीत्या त्रास सहन करावा लागत आहे म्हणून महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांच्याकडे प्रा.धीरज पाटील यांनी मोहरम व गणेशोत्सव दरम्यान ग्राहकांची वीज खंडित करू नये, असे निवेदन सादर केले आहे. सणासुदीच्या काळात वारंवार खंडित वीज पुरवठा होत असून 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता शिक्षक कॉलनीतील तक्रारीची दखल 1 सप्टेंबरला संध्या 5 वाजता घेण्यात आली व संपूर्ण यावल रोड व जळगाव रोड भागातील वीज रात्री 9.30 वाजेपर्यंत खंडित करण्यात आली. वीजपुरवठा खंडित झाल्यावर आपल्या अभियंत्यांशी बोलणे केल्यास त्याची त्यांना खबर नसते, नवीन कनेक्शनसाठी अवाजवी रक्कम आकारली जाते, अश्या परीस्थितीत फक्त गरीब व सामान्य कुटुंबातील ग्राहकांची वीज खंडित केली जाते. लाखोंचे देयक असणार्‍या वीज ग्राहकांनी वर्षभरापासून एकही रुपया वीज बिल जमा केले नसल्याची माहिती समोर आली आहे आधी त्यांच्यावर कारवाई करावी असे निवेदनात नमूद केले आहे.

उत्सवात वीज खंडित केल्यास आंदोलन
सध्या गणेशोत्सव व काही दिवसांनी मोहरम सण साजरा केला जाणार असून या उत्सवाच्या काळात सामान्य ग्राहकांची छोट्या वीज देयकांसाठी वीज खंडित केल्यास शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हासंघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरळकर व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी आंदोलन उभारतील अशा इशारा देण्यात आला आहे.


कॉपी करू नका.