हतनूर धरणातील पाणी ओझरखेडा तलावात
भुसावळ : ओझरखेडा साठवण तलावातून आगामी काळात दीपनगर औष्णिक केंद्राला पाणीपुरवठा केला जाणार असून त्यासाठी हतनूर धरणातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी 300 अश्वशक्तीच्या पंपाने उचलून वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेवरील ओझरखेडा साठवण तलावात टाकण्याच्या कामास गुरुवारी सायंकाळी सुरुवात झाली. गतवर्षी 30 दलघमी जलसाठा याच पद्धतीने करण्यात आला होता. ओझरखेड्यातून दीपनगर केंद्रापर्यंत 1600 मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या पाण्याचा वापर दीपनगरात वीजनिर्मितीसाठी केला जाणार आहे. तसेच तलावात पूर्ण क्षमतेने साठा झाल्यानंतर विजनिर्मितीसाठी पाणी पुरवले जाईल. त्यामुळे हतनूर धरणातील पाण्याची बचत होणार असल्याने, पाणीवापर संस्थांना दिलासा मिळेल.