अट्टल दुचाकी चोरटे नंदुरबार एलसीबीच्या जाळ्यात : 11 दुचाकी जप्त
चार आरोपींना अटक : शहाद्यासह म्हसावद पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा
नंदुरबार : शहादा परीसरातील मोटर सायकल चोरीच्या पाच गुन्ह्यांचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला असुन 11 दुचाकींसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दुचाकी चोरींबाबत शहादा व म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक
लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे शहादा परीसरात मोटर सायकली चोरी होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या प्रकारांची दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांना गुन्ह्यांची उकल करून आरोपी अटकेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांनी गोपनीय बातमीदार सक्रीय करून सदर दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी हवालदार दीपक गोरे, सजन वाघ, विनोद जाधव, विकास अजगे, किरण पावरा, विजय धीवरे, सतशी घुले यांचे विशेष तपास पथक तयार करून परीसरात बातमी काढण्यासाठी रवाना केले. पथकाने मागील 10 दिवसांपासुन शहादा व म्हसावद परिसरातील 20 ते 25 गावांमध्ये भ्रमंती करुन बाजार असलेल्या दिवसांमध्ये विक्रेते, शेतकी साहित्य विक्री करणारे प्रतिनिधी, अशा विविध प्रकारे वेषांतर करुन माहिती मिळविली. मिळविलेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर अमोदा गावातील सनी चरणसिंग पाडवी यास सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता घराच्या पाठीमागे लपवून ठेवलेली चोरीची एक दुचाकी काढुन दिली तसेच त्याचे साथीदार पवन रंजित वसावे (रा.अमोदा), हेमंत संतोष बागले, गणेश रवींद्र राजपूत (दोन्ही रा.मडकाणी) व योगेश परदेशी (रा.म्हसावद) यांनी 11 दुचाकी चोरीची कबुली दिली. योगेश परदेशी हा इसम पसार झाला असून अन्य आरोपींच्या चौकशीत त्यांनी चोरी केलेल्या 11 मोटर सायकली काढून दिल्या.





आरोपींचा शहादा पोलिसांकडे ताबा
मोटर सायकलींबाबत खात्री केली असता शहादा पोलिस ठाण्यात तसेच म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्ह्यातील चोरी झालेल्या पाच दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर चारही आरोपींना अटक करुन दोन लाख 45 हजार किंमतीच्या चोरीच्या 11 दुचाकी व आरोपींचा ताबा शहादा पोलिसांना देण्यात आला आहे. या आरोपींकडून अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, दीपक गोरे, सजन वाघ, प्रमोद सोनवणे, विनोद जाधव, विकास अजगे, किरण पावरा, विजय धीवरे, सतीश घुले यांच्या पथकाने पार पाडली.
