शहाद्यानजीक चार लाखांचा गांजा पकडला
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन आरोपींना अटक
नंदुरबार : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे चार लाख 27 हजार 945 रुपये किंमतीचा 61 किलो सुका गांजा पकडला असून चारचाकी वाहनासह दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. नंदुरबार
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्या नेतृत्वात 22 रोजी रात्री साडेआठ वाजता शहादा तालुक्यातील दरा फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोप्या डेमच्या पावरा (25, धडगाव पिंप्री, ता.धडगाव) व विनोद भगवान चव्हाण (21, रा. वडफळ्या, ता.धडगंव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धडगाव येथून अमली पदार्थ सुका गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचला होता. शहादा तालुक्यातील दरा फाट्यावर नाकाबंदी करण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री 08.30 वाजेच्या सुमारास धडगाव गावाकडून महिंद्रा गाडी वेगाने येतांना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वाहन उभे करण्याचा इशारा दिला मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने गाडी पुढे नेल्यानंतर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करुन गाडीला थांबवले आणि त्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले. वाहनात असलेल्या प्लास्टीकच्या गोणीत चार लाख 27 हजार 945 रुपये किंमतीचा 61 किलो 135 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा तसेच पाच लाख रुपये किमंतीची एक महिंद्रा मॅक्स कंपनीचे वाहन (क्रमांक एम.एच.39-0913) मिळून एकूण नऊ लाख 27 हजार 945 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला.





