42 लाखांचे अपसंपदा प्रकरण : माजी कक्ष अधिकारी राजेंद्रकुमार गावीतांच्या नंदुरबारसह नटावद गावातील घराची एसीबीकडून झडती
नंदुरबार : मुंबई मंत्रालयातील माजी कक्ष अधिकारी राजेंद्रकुमार गावीत व त्यांच्या पत्नी तथा तत्कालीन पोलिस निरीक्षक इला गावित यांच्याविरुद्ध सुमारे 42 लाखांची अपसंपदा बाळगल्याप्रकरणी सोमवारी रात्री धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी नंदुरबार एसीबीच्या पथकाने गावीत यांच्या नटावद व नंदुरबार शहरातील झर झडती सुरू केली आहे. या झडतीत नेमके काय आढळले ? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून घर झडती सुरू आहे.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवली
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील रहिवासी असलेले राजेंद्रकुमार कृष्णराव गावीत हे 1 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 2013 दरम्यान मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या पत्नी इला गावीत या पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना सात वर्षांपूर्वी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान 2005 ते 2013 पर्यंतच्या गावीत यांच्या अर्जित शासकीय संपदा व खर्च यांची चौकशी व ताळमेल घालण्यात आला. त्यातून गावीत यांच्याकडे आपल्या उत्पन्नापेक्षा 42 लाख 49 हजार 340 रुपयांची अपसंपदा मिळून आली तर त्यांच्या पत्नी ईला गावित यांनी अपसंपदा आपल्या नावे करून सहकार्य केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुर्हाडे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





