भुसावळ शहर सौंदर्यीकरणासाठी आणलेल्या वृक्षांची लूट


सत्ताधारी नगरसेवकाने झाडे मागितल्यावर मात्र पालिकेचे नियमावर बोट

भुसावळ- मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 7 रोजी भुसावळात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात रस्त्यांच्या डागडूजीसह वृक्षारोपणाचे काम वेगात सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर वृक्ष लावण्यासाठी 10 ते 15 फूट उंचीचे विविध प्रजातीची झाडे आणल्यानंतर शहरवासीयांनी अक्षरशः झाडे लांबवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. पालिका प्रशासन व संबंधित अधिकार्‍यांचा कुठलाही वचक नसल्याने ही आफत ओढवली तर दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवक अमोल इंगळे यांनी प्रभागासाठी रोपे मागितल्यानंतर त्यांना मात्र नियमावली दाखवण्यात आल्याने त्यांनी या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

लाखोंचा खर्च पाण्यात जाण्याची भीती
शहरात वृक्षारोपणासाठी सुमारे 60 लाख रुपये किंमतीची 10 हजार झाडे लावण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच हजार झाडे पालिकेला प्राप्त झाली आहेत. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास यावल रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात आंबा, कडूनिंब, सीताफळ, पेरू, डाळींब, फणस, पाम, अशोकाची 10 ते 15 फूट उंचीचे झाडे आणल्याचे कळताच नागरीकांच्या अक्षरशः झाडे घेण्यासाठी उड्या पडल्या तर काही नर्सरी चालकांनीही झाडे लांबवल्याची चर्चा होती. नागरीकांनी झाडे लांबवण्यासाठी थेट रीक्षा, टेम्पो, ट्रॅक्टर आणल्याचे चित्र होते. शहर सौंदर्यीकरणासाठी आणलेल्या महागडी रोपे अशा पद्धत्तीने लांबवली गेल्याने सुज्ञ नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वृक्ष लागवडीसाठी जरी नागरीकांनी झाडे नेली असलीतरी त्यासाठी पालिकेने स्वतंत्र नोंद ठेवून हमीपत्र भरूनच झाडे द्यायला हवी होती, असा सूर शहरातून उमटताना दिसला.

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार -अमोल इंगळे
प्रभागातील नागरीकांना आपण झाडे देण्याचे आश्‍वासन दिले होते शिवाय त्यासाठी झाडे देताना हमीपत्र व फोटोदेखील घेणार होता शिवाय ज्यांनी झाडे जगवली नाही त्यांना दोनशे रुपये दंडाचीही तरतूद केली होती मात्र आपण झाडे मागितल्यानंतर अधिकार्‍यांनी नियमावली सांगितली तर दुसरीकडे नागरीकांना कुठलीही शहानिशा न करता पालिकेच्या अधिकार्‍यांनी झाडे दिली त्यामुळे या प्रकाराला दोषी असणार्‍या अधिकार्‍यांबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करू, असे सत्ताधारी नगरसेवक अमोल इंगळे म्हणाले. पालिकेच्या कर्मचार्‍यांवर कुणाचाही अंकुश नसल्याचेही ते म्हणाले.

हमीपत्र घेवूनच वृक्षांचे वाटप -नगराध्यक्ष
कुणाही नागरीकांना झाडे देण्यात आली नाहीत शिवाय ज्यांना झाडे देण्यात आली त्या संस्थांकडून हमीपत्र घेण्यात आले असून त्यासाठी माणसे नेमण्यात आल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. पालिकेच्या लोकांनी नर्सरीही तपासल्या मात्र त्यात पालिकेने आणलेली झाडे आढळली नसल्याचे ते म्हणाले.


कॉपी करू नका.