यावलमध्ये सेवानिवृत्त सहा.फौजदाराच्या लाखाच्या रोकडवर चोरट्यांचा डल्ला
यावल- सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी सोमवारी दुपारी लाखाची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने े शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी रात्री उशिरा यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार विजय मधुकर बावस्कर (अट्रावल, ता.यावल) हे चार ते पाच महिन्यांची पेन्शन एकत्रीत काढतात. शेतीसाठी त्यांना एक लाख हवे असल्याने त्यांनी सोमवारी दुपारी 12.30 वाजता यावल स्टेट बँकेतून चेकद्वारे रक्कम काढून ती कापडी पिशवीत ठेवून दुचाकी (एम.एच.19 डी.बी.8110) मध्ये ठेवली. डिक्कीला लॉक करून ते यावल पोलिस ठाण्यात सहकारी मित्रांना भेटून अट्रावलकडे निघाले मात्र रस्त्यात त्यांनी भुसावळ टी पॉईंटवर गुरूनानक इलेक्ट्रीकल्स स्टोअरवर इलेक्ट्रीक बोर्डाचे बटण पाहिले मात्र ते पसंत न आल्याने ते दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकीची डिक्की उघडी दिसली व त्यातून रोकडसह पिशवी लांबवल्याचे उघड झाले. रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.