मैत्रेय ठेवीदारांना दिलासा : टप्प्याटप्प्याने गुंतवणूकदारांना मिळणार परतावा
मुंबईत बैठक : ठेवीदारांची हक्काची रक्कम परत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध -पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांची ग्वाही
मुंबई : राज्यभरातील लाखो ठेवीदारांच्या ठेवी मैत्रेय कंपनीत अडकून पडल्या असून ठेवीदार हवालदील झाले असताना ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मंगळवारी राज्यभरातील मैत्रेय मधील गुंतवणुकी संदर्भात गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देण्यासंदर्भात मंत्रालयात गृहराज्यमंत्री यांच्या दालनात अधिकारी व मैत्रेय असोसिएशनचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत मैत्रेयच्या मालमत्तांचा लिलाव करून न्यायालयाच्या आदेशान्वये टप्प्याटप्प्याने गुंतवणूकदारांना परतावा देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. काहीही झाले तरी गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
आमदारांनी सर्वप्रथम उठवला आवाज
मैत्रेय मधील गुंतवणूक व तिचा परतावा यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी सर्वात प्रथम 2016 मध्ये विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा विषय चव्हाट्यावर आला होता. मागील काळात सुमारे 15 बैठका याबाबत मुंबई येथे झाल्या. त्यात मैत्रेयच्या मालमत्ता सर्च करणे, गुन्हे एकत्रभत करणे, मालमत्तेची किंमत ठरविणे आदि प्रक्रिया पार पडली होती. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका व नंतर कोरोना महामारी यामुळे हा विषय लांबणीवर पडला होता .याबाबत सर्वात प्रथम प्रश्न उपस्थित करणारे आमदार किशोर पाटील यांनी या विषयाला पुन्हा चालना दिली असून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे या बाबतचा पाठपुरावा केल्याने मंगळवार, 12 जानेवारी रोजी मंत्रालयातील गृहराज्यमंत्री यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार किशोर पाटील, गृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे, उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एम.एन.परब, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून रवींद्र शिंगाळे, मैत्रेय असोसिएशनचे ज्ञानेश्वर पाटील, विनायक चव्हाण, गौतम महाजन, दत्तात्रय शिंगाडे, हरगोविंद गुप्ता आदी उपस्थित होते .





विविध विषयांवर बैठकीत चर्चा
या बैठकीत मैत्रेय संदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. मालमत्ता सर्च करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करणे, रक्कम न्यायालयात त्याच्या स्वाधीन करणे व न्यायालयाच्या आदेशानुसार गुंतवणूकदारांना त्याचा परतावा करणे आदि विषयां संदर्भात चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. तसेच याबाबत गुंतवणूकदारांची संख्या व परताव्याच्या रकमा प्रचंड असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसारच परताव्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही कार्यवाही कशा पद्धतीने पूर्ण होते ते या संदर्भात आढावा घेण्यासाठी पुढील महिन्यात व त्यानंतरही नियमितपणे बैठका घेण्याचे ठरले.
गुंतवणूकदारांना ठेवींच्या रकमा परत मिळवून देणार : आमदार किशोर पाटील
मालमत्तांचा लिलाव, रकमेचे संकलन, न्यायालयीन प्रक्रिया या सर्व बाबी दीर्घकाळ चालणार्या असल्याने त्यास थोडा विलंब होईल परंतु कोणत्याही परीस्थितीत मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा परत मिळतील असे दिलासादायक मत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले. यामुळे मैत्रेय गुंतवणूकदारांच्या परताव्या संदर्भातील अपेक्षा वाढीस लागल्या आहेत.
