देवमोगरा तलाठी नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात
सातबारा उतार्यावरील नावात दुरुस्तीसाठी पंधराशे रुपयांची लाच भोवली ः
नंदुरबार : सातबारा उतार्यावर लागलेल्या नावात दुरुस्तीसाठी पंधराशे रुपयांची लाच मागणार्या देवमोगरा सजा खांडबारा येथील तलाठ्याला लाच स्वीकारताच नंदुरबार एसीबीच्या पथकाने अटक केली. जयसिंग गुंजार्या पावरा (रा.नंदुरबार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दुसर्यांदा अडकला तलाठी एसीबीच्या जाळ्यात
नवापूर येथील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या वडिलांचे डोगेगाव शिवार, ता.नवापूर येथे गट क्रमांक 101/2 ही शेतजमीन आहे. या जमिनीच्या सातबारा उतार्यावर त्यांच्या वडिलांचे लागलेल्या नावात दुरुस्ती होण्यासाठी तलाठी जयसिंग पावरा यांनी 20 जानेवारी रोजी एक हजार 500 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला व बुधवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपी तलाठ्यावर 12 मार्च 2018 रोजी देखील एसीबीने लाच घेताना अटक केली होती तर कर्तव्यावर हजर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा लाच मागण्याचे उद्योग सुरू केले.





