माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे अखेर निधन
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 67 व्या वर्षी मालवली प्राणज्योत
नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रात्री उशिरा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली.
ट्वीटच्या काही तासानंतर निधन
स्वराज यांनी सुमारे तीन तासांपूर्वी आपल्या सोशल मिडीयाच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करीत काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल पंतप्रधान मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. या क्षणाची आपण आयुष्यभर वाट पाहत होते, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळातच स्वराज यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आल्यानंतर काही वेळेत त्यांचा मृत्यू झाला.