अमळनेरातील हरवलेला बालक पुण्यात आढळला
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : मुलाला पाहताच आई-वडिलांनी मारली मिठी
जळगाव : अमळनेरातील 17 वर्षीय बालक काम-धंद्यांच्या शोधार्थ 26 ऑगस्ट रोजी अचानक खाजगी बसने पुण्यात पोहोचला मात्र घरच्यांना कल्पना नसल्याने त्यांनी शोधाशोध घेतल्यानंतर अमळनेर पोलिसात मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बालकास पुण्यातील चिंचवड भागातील भूमकर चौक परीसरातून ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले. मुलाला पाहताच आई-वडीलांनी त्यास मिठी मारली तर हा प्रसंग पाहून वर्दीतील दर्दीही सुखावले.
यांनी लावला बालकाचा शोध
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम व अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडील हवालदार विजय देवराम पाटील, नरेंद्र वारुळे, अमळनेर पोलीस स्टेशनचे सुनील रामदास पाटील यांनी पुण्यातील चिंचवड परीसरातून बालकास ताब्यात घेत अमळनेरस्थित पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी हा बालक घरातून कटींग करण्यासाठी बाहेर पडला मात्र बाहेर जावून काही तरी कामधंदा करावा या उद्देशाने त्याने खाजगी बसने थेट पुणे गाठल्याची माहिती समोर आली आहे.