भुसावळ शहरातील खड्डे मोजून दाखवल्यास लाखाचे बक्षीस
माजी आमदार संतोष चौधरी यांचे आवाहन : पालिकेच्या कारभारावर सडकून टिका
भुसावळ- भुसावळ शहरातील खड्डे कुणी मोजून दाखवल्यास त्यास आपण एक लाख 11 हजारांचे बक्षीस देवू, असे आवाहन माजी आमदार संतोष चौधरी यांनी करीत शहरातील खड्ड्यांबाबत पालिकेवर टिकेची झोड उडवली. ग्रामीण भागात निकृष्ट पद्धत्तीची विकासकामे झाली शिवाय त्यातून 35 टक्के कमिशन लाटण्यात आले याबाबत हवे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुरेशी यांना विचारा, असा टोलाही त्यांनी कुणाचे नाव न घेता लगावला. राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश घुले निवडून आल्यानंतर त्या-त्या गावातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना कामे दिली जातील व कमिशनबाजीला आळा घालू, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा बुधवारी सायंकाळी तेली समाज मंगल कार्यालयात झाला. याप्रसंगी झालेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
भुसावळची जागा राष्ट्रवादीकडेच
भुसावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडेच असून शरद पवार साहेबांना विचारूनच सतीश घुले यांचे अधिकृत नाव आपण जाहीर केल्याचे माजी आमदार चौधरी म्हणाले. शासनाची कर्जमाफी योजना फसवी असून जनतेचा विश्वासघात या सरकारने केला आहे. भुसावळ शहर दहा वर्षात बकाल झाले असून ग्रामीण भागातील समस्यांचीही नोंद घेतल्याचे ते म्हणाले.
गोर-गरीबांसाठी सुसज्ज रुग्णालय बांधणार
भुसावळातील साईबाबा ट्रस्टचा मी अध्यक्ष असून गडकरी नगरातील एक एकर जागेवर गरीबांसाठी सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येईल शिवाय ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका व दोन पाण्याचे टँकर घेवू, असेही माजी आमदार चौधरी म्हणाले. आगामी शैक्षणिक वर्षात पहिली ते दहावी शिक्षण घेणार्या एक हजार विद्यार्थ्यांची शैक्षणिक जवाबदारी घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आजच्या सत्ताधार्यांनी कामे थांबवली -उमेश नेमाडे
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, आज सत्तेत बसलेल्या सत्ताधार्यांनी त्यावेळी विकासकामे होवू दिली नाहीत. माजी मंत्री खडसेंनी भुसावळातील बियाणी स्कूलमधील सभेत आमदार संजय सावकारे हे पालिकेचा कारभार पाहणार असल्याचे सांगितले मात्र शहरातील खड्ड्यांबाबत आमदार जवाबदारी झटकून हे काम पालिकेचे असल्याचे सांगतात मात्र दुसरीकडे स्वतःच खड्डे बुजवत असल्याने ही वेळ का आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत अमृत योजना राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झाल्याचे ते म्हणाले. यावेळी उमेदवार सतीश घुले यांनी बोलण्यापेक्षा विकासकामे करून दाखवण्यावर आपला भर राहणार असल्याचे सांगितले तर अॅड.रवींद्र भैय्या पाटील यांनी रस्त्यांची दुरवस्था, ग्रामीण भागातील विदारक चित्राचा संदर्भ देत भाजपा सरकारवर टिका केली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी रवींद्र नाना पाटील, नितीन धांडे, सचिन चौधरी, उल्हास पगारे, युवराज पाटील, अरविंद मानकरी, ललित बागुल, मयुरी पाटील आदी पत्रकार परीषदेला उपस्थित होते.