नंदुरबार जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा घोळ : खासदार हिना गावीतांच्या आरोपाने खळबळ
नंदुरबार : जिल्ह्यात रेमडेसिवी इंजेक्शनचा मोठा घोळ असून या घोटाळ्यात जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्यांचे छुपे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप खा.डॉ. हिना गावीत यांनी पत्र परीषदेतून केल्याने जिह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
इंजेक्शनअभावी दगावले रुग्ण
डॉ.गावीत म्हणाल्या की, कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. इंजेक्शन पुरवठा करण्यात जिल्हाधिकार्यांचे नियोजन चुकल्याने नंदुरबारसाठी मिळणारे इंजेक्शन थेट पुणे मुंबईसारख्या शहरात जात असल्याचा आरोपही खा.डॉ.हिना गावीत यांनी केला. कोविड रुग्णालयांसाठी इंजेक्शनचा पुरवठा केल्याची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसारीत केली आहे. ती चक्क दिशाभूल करणारी आहे. प्रत्यक्षात रुग्णालयांना कमी प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासनाने ती आकडेवारी मोठ्या प्रमाणावर दाखवून दिशाभूल केली आहे. त्यामुळे इंजेक्शन वितरणात मोठा घोळ होत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. यावेळी आ. डॉ.विजयकुमार गावित उपस्थित होते.





