….तर रोहित पवारांचीही चौकशी करणार आहात का?
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचा पत्रकार परीषदेत सवाल
नंदुरबार : कोरोना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रेमडीसीवर इंजेक्शनचे वाटप केले म्हणून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी चौकशीचे आदेश दिले, मग रोहित पवार यांनीदेखील इंजेक्शनचे वाटप केले आहे, त्यांचीही चौकशी करणार काय? असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परीषदेत केला.
इंजेक्शन उपलब्ध करून दिले तर काय गुन्हा केला?
रेमडीसीवर इंजेक्शन वाटपात काळाबाजार केल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची परीस्थिती गंभीर आहे. रेमडीसीवर इंजेक्शनसाठी लोकांना भटकावे लागत आहे, अशा परीस्थितीत सरकारने जनतेला वार्यावर सोडले, इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरले, अश्या परीस्थितीत जर भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिल तर काय गुन्हा केला? अशा संकटकाळात आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मदतीला धावून जाणे अपेक्षित असते. मात्र तसे झाले नाही. अशा प्रसंगी भाजपाचे नेते, पदाधिकारी धावून जात आहेत, त्याचं कौतुक करण्याऐवजी त्यांना रोखण्याचे काम केले जाते आहे, मृत्यूच्या दारात लोकांना नेले जात आहेत, जर माजी आमदार शिरीष चौधरी यांची चौकशी करायची असेल तर रोहित पवारांचीदेखील चौकशी करावी लागेल. त्यांनीही कोरोना रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी इंजेक्शनचे वाटप केले आहे, हा काय गुन्हा आहे काय? असा प्रश्न विजय चौधरी यांनी केला. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना विनंती करून ते म्हणाले की, रुग्णांना बरं करण्याचे काम खाजगी दवाखान्यातील डॉक्टर करीत आहे. मात्र गैरवाजवी बिल आकारण्यात येत असल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. म्हणून डॉक्टरांनी अशा परस्थितीत सहानुभूती दाखवून योग्य बिल द्यावे, असे आवाहन विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेतून केले.





