खासदार होण्यापूर्वी हिना गावीत यांनी लावलेला शिबिरांचा धडाका आता बंद का ?
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल
नंदुरबार : रेमडीसीवीर इंजेक्शन वाटपात आम्ही भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार हिना गावीत यांनी केला होता, त्याला प्रत्युत्तर देताना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, दुसर्यावर आरोप करण्याआधी स्वतःचे घर काचेचे आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. सीबीआय चौकशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी आदी विविध चौकशीने गावीत परीवार भ्रष्टाचाराचे केंद्र ठरले आहे, हे सार्यांना माहीत आहे. खासदार हिना गावीत यांनी खासदार होण्याआधी विविध आरोग्य शिबिरे घेण्याचा धडाका लावला होता, मग आता अशा परिस्थितीत का बंद केला , त्या स्वतः डॉक्टर आहेत, त्यांच्या भगिनीदेखील डॉक्टर आहेत, या दोघांनी कोविड सेंटरला योगदान देणे अपेक्षित होते, मात्र ते होणार नाही, असे मत माजी आमदार रघुवंशी यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त करीत अनेक धक्कादायक आरोप केले.
मग खासदारांनी हे का केले नाही ?
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या परीस्थितीचे गांभीर्य ओळखून रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकार्यांच्या मदतीने एक हजार इंजेक्शन मिळविले, ते गरजूंना शासन दरापेक्षा कमी किमतीत विकले. त्याची सर्व यादी आम्ही जिल्हाधिकार्यांना सादर केली आहे. भाजपाचे खासदार सुभाष भामरे, सी.आर. पाटील यांनीही रुग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत, मग नंदुरबारच्या खासदारांनी ते का केले नाही? 1500 रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याचा दावा खासदार हिना गावीत यांनी केला आहे. हे इंजेक्शन कोणाच्या नावाने खरेदी केले? कोणत्या रुग्णालयांना पुरविले? याचा खुलासा खासदार हिना गावीत यांनी करावा, असे खुले आव्हान माजी आमदार रघुवंशी यांनी केले आहे. रेमडीसिविर इंजेक्शन वाटपात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार हिना गावीत यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सोमवारी पत्रकार परीषद घेऊन पुरावे सादर केले. सीबीआय चौकशी, लाचलुचपत विभागाची चौकशी अशा अनेक चौकशांनी गावीत परीवार भ्रष्टाचाराचे केंद्र ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला.





