दीपनगरातील संच पाच होणार कार्यान्वित : वीजनिर्मिती क्षमतेत होणार वाढ


भुसावळ – उन्हाळ्यात सलग साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस वीज निर्मिती केल्याने दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक पाचच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामाला प्रशासनाने सुरवात केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तो कार्यान्वित केला जाणार आहे. जनरेटर, टर्बाईन, बॉयलर आदी प्रमुख सयंत्रांसह अन्य यंत्रणेची सुद्घा देखभाल दुरुस्ती केली जाणार असल्याने या संचाच्या वीजनिर्मिती क्षमतेत वाढ होणार आहे.

शंभर टक्के वीज निर्मितीसाठी देखभाल दुरुस्ती
औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 500 बाय दोन संचांनी उन्हाळ्यात 100 पेक्षा अधिक दिवस अविरत वीज निर्मिती करण्यात आली होती. यामुळे या संचाच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले होते. महानिर्मिती प्रशासनाने या कामासाठी ऑगस्ट महिन्यात हा संच बंद केला होता. गेल्या दिड महिन्यांपासुन हा वीज निर्मिती संच बंद ठेवून या संचांचे बॉयलर, टर्बाईन, कोलमिल, जनरेटर या संयंत्राची दुरुस्ती करण्यात आली होती. ती सध्या अंतीम टप्प्यात पोचली असुन, दुरुस्तीनंतर या संचांची क्षमतेत यामुळे वाढ झाली आहे. सध्या संच क्रमांक पाचमधून सरासरी 450 ते 470 मेगावॅट विजनिर्मिती केली जाते आहे. वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामानंतर या संचांतून 500 मेगावॅट पूर्ण क्षमतेने विजनिर्मिती होण्यास मदत होणार आहे. राज्यभरात सध्या होत असलेल्या पावसामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे, मात्र ऑक्टोबर महिन्यात पावसाळा संपल्यानंतर वीजेची मागणीत वाढ होईल. घरगुती, कृषी व औद्योगिक विजमागणी वाढणार असल्याने या काळात दीपनगरातून अधिक वीजनिर्मिती करण्याचे उद्दीष्ट महानिर्मिती प्रशासनाची असेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. स्थापित क्षमतेइतकी 100 टक्के वीजनिर्मिती व्हावी, म्हणून वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.