भुसावळात रेल्वे गेट बंद : संतप्त जमावाने रेल्वे रोखल्या
दोन एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या : व्यापक रेल्वे रोको आंदोलनाच्या इशार्यानंतर नरमले रेल्वे प्रशासन, चर्चेअंती अखेर रेल्वे गेट उघडले
भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स कडून झेडटीआरआयसह दीपनगरकडे जाणार्या रस्त्यावरील रेल्वे गेट क्रमांक 156, 156 ए व 156 बी हे गेट सेामवारी रेल्वे प्रशासनाने बंद केल्यानंतर संतप्त वाहनधारकांसह नागरीकांनी रेल्वे प्रशासनाविषयी तीव्र रोष व्यक्त करीत रेल्वे पटरीवर ठिय्या मांडला. या प्रकारानंतर प्रचंड खळबळ उडून रेल्वे प्रशासनासह पोलिस, लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या यंत्रणेने धाव घेत जमावाला बाजूला सारले. या प्रकारात अप-डाऊन मार्गावरील दोन रेल्वे गाड्या खोळंबल्या. रेल्वे प्रशासन व मिलीटरी या दोन विभागातील समन्वयाअभावी मात्र नागरीकांना मनस्ताप होत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेविषयी नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलिस प्रशासनाने आंदोलकांना बाजूला घेत समजूत काढली. प्रसंगी रेल्वे प्रशासन व मिलिटरी प्रशासनाकडे नागरीकांनी व्यथा मांडल्या तर मंगळवारी व्यापक रेल्वे रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देणारे निवेदन प्रशासनाला देवून आंदोलकांनी चर्चा करताच रेल्वे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत सोमवारी सायंकाळी सहा वाजता गेट उघडले.
अंडरपास खुला न करताच गेट केले बंद
रेल्वे विभागाने झेडटीसी मार्गावर अंडरपासचे काम सुरू असून काम सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे तर मिलीटरीच्या हद्दीतून आता पुढील अंडरपासचे काम काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. असे असताना सोमवारी खंडवा लाईनवरील 156, भुसावळ यार्ड बे लाईनवरील गेट क्रमांक 156 ए तसेच भुसावळ यार्ड कार्ड लाईनवरील गेट क्रमांक 156 बी हे तिन्ही गेट बंद करण्यात आले. या तिन्ही गेटजवळ या मार्गावरील वाहतूक 19 सप्टेंबरपासून बंद करण्यात आली असून नागरीकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या मार्गाने वापर करावा, अशा सूचनेचा फलक लावण्यात आला. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान हे गेट बंद असल्याचे पाहून रीक्षा चालक, दीपनगर, आयुध निर्माणी, झेडटीसी भागातील रहिवासी तसेच संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान शहरातील शाळा सुटल्यानंतर या मार्गाने जाणारे विद्यार्थी, पालक, रीक्षा चालक थांबून राहिले तर वाहनधारकांचा संताप अनावर झाल्याने नागरीकांनी थेट रेल्वे रूळावर येत ठिय्या मांडला तर काहींनी झोपून आंदोलन केले. यावेळी अप मार्गावरील 12108 लखनऊ एलटीटी व डाऊन मार्गावरील डाऊन मार्गावरील 12165 एलटीटी वाराणसी एक्सप्रेस दोन्ही बाजूंनी थांबवून ठेवण्यात आल्या. या दोन्ही गाड्यांना 20 ते 30 मिनिटांचा विलंब झाला. अखेर आरपीएफ जवानांनी आंदोलकांना रेल्वे रुळांवरुन बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. यानंतर तिन्ही रेल्वे गेटवर आरपीएफ जवानांसह, शहर, बाजारपेठ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
रेल्वे प्रशासन म्हणते, मिलीटरी विभागाचे असहकार्य
रेल्वे विभागाने खंडवा लाईनवरील 156, भुसावळ यार्ड बे लाईनवरील गेट क्रमांक 156 ए तसेच भुसावळ यार्ड कार्ड लाईनवरील गेट क्रमांक 156 बी हे तिन्ही गेट बंद करण्याच्या यापूर्वीच निर्णय घेतला आहे. याच दृष्टीने अंडरपासचे काम करण्यात आले मात्र मिलीटरी (आर्मी) विभागाकडून मिलीटरी स्टेशनच्या समोरील मार्गावर काम करण्यास परवानगी मिळत नाही. यामुळे अंडरपासचे काम थांबले, अशी माहिती यावेळी रेल्वेचे विभागीय अभियंता दीपक कुमार, आर. एस. तोमर यांनी आंदोलकांना दिली. वर्षभरापासून पत्रव्यवहार करण्यात आले मात्र सहकार्य मिळत नसल्याचे अधिकार्यांनी यावेळी सांगितले.
आधी अंडरपास करा : आंदोलक
रेल्वे विभागाने अंडरपासचे काम पूर्ण करून यातून वाहतूक सुरळीत करावी, त्यानंतर तिन्ही गेट बंद करावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी रेल्वे प्रशासन व पोलिस प्रशासनाकडे केली. या मार्गावरुन गोलाणी संकूल, कंडारी, झेडटीसी, दीपनगर, निंभोरा, फेकरी आदी भागांतील तब्बल 18 ते 20 हजार नागरीक ये-जात करतात. शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्ण, महिला, नोकरदार, मजूर आदींना शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरुन सात ते दहा किलोमिटरच्या फेर्याने वाहतूक करणे मोठे खर्चिक होणार असल्याने आधी अंडरपास सुरू करावा नंतर गेट बंद करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आर्मी करणार पत्रव्यवहार
आर्मी विभागाच्या अडसरमुळे पाच टक्के काम रेंगाळल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्यांनी दिल्यानंतर आंदोलकांच्या पाच जणांचे शिष्टमंडळ तसेच रेल्वे अधिकार्यांनी मिलिटरी स्टेशनमध्ये जाणून अधिकार्यांशी संवाद साधला. मात्र मिलिटरी अधिकार्यांनी याबाबतचे प्रकरण आम्ही वरीष्ठांकडे पाठवले असून वरीष्ठांकडून आपणास पत्रव्यवहार होईल, असे स्पष्ट सांगून अधिक बोलणे टाळल्याची माहिती उपस्थित आंदोलकांनी दिली. रेल्वेचे काम पूर्ण होत नसल्याने गेट बंद करुन नाहक नागरिकांना छळले जात आहे, दोन विभागांच्या वादात नागरीकांचा बळी घेतला जात असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
रेल रोकोच्या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आरपीएफ जवानांसह शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे तसेच राखीव पोलिस दलाच्या जवानांचा बंदोबस्त गेटवर लावण्यात आला. आरपीएफचे सहाय्यक आयुक्त राजेश दिक्षीत, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस ठाण्याचे बाबासाहेब ठोंबे, आरपीएफ रीजर्व्हचे उपनिरीक्षक अरुण ठवरे आदींसह कर्मचार्यांनी धाव घेतली. कंडारीचे ग्रामपंचायत सदस्य डॉ. सूर्यभान पाटील, यशवंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शामा मोरे, हर्षल नारखेडे, पोलिस पाटील रामा तायडे, झेडटीएस भागातील माजी उपसरपंच मेश्राम आदींनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
तर रेल रोको आंदोलन
झेडटीसी, फेकरी, गोलाणी कंडारीच्या गावकर्यांनी सोमवारी गेटजवळ रेलरोको आंदोलन करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर रेल्वे प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मात्र मंगळवारी सकाळपर्यंत हे गेट कार्यान्वित न झाल्यास व्यापक रेल्वे रोकोचा इशारा देण्यात आला. संतप्त जमावाने अप व डाऊन साईडच्या मार्गावर तीव्र आंदोलन करुन संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प करू, असा गर्भित इशारा निवेदनाव्दारे दिला.
सुमारे सहा किलोमीटरचा फेरा
झेडटीसी, कंडारी भाग, गोलाणी, फेकरी, निंभोरा, दीपनगर आदी भागातील नागरीकांना शहरात येण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे, अवघ्या तीन ते चार किलोमिटर अंतर कापून शहरात पोचता येते, मात्र गेट बंद झाल्याने झेडटीसी भागातील नागरिकांना फेकरी गावातून राष्ट्रीय महामार्ग, वरणगाव वाय पॉइंट, शिवाजीनगर, बसस्थानकामार्गे शहरात यावे लागेल. किमान सात ते नऊ किलोमिटरचा फेरा होईल. मार्गावरुन शाळकरी विद्यार्थ्यांचीही वाहतूक करावी लागेल, यामुळे अपघाताचे धोके वाढतील, असे मुद्देही आंदोलकांनी रेल्वेच्या अधिकार्यांसोबत केलेल्या चर्चेत मांडले.
बैठकीतील निर्णयानंतर रस्ता सुरळीत
सायंकाळी डीआरएम कार्यालयात झालेल्या उच्चपदस्थ अधिकार्यांच्या बैठकीनंतर हा सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्ता पूर्ववत वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी होणारे आंदोलनही तूर्त स्थगित करण्यात आले असून अंडरपासचे काम पूर्ण होऊन त्यातून वाहतूक सुरळीत झाल्यानंतर गेट बंद केले जाईल, असेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.