जळगाव मत्स्य विभागाच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात
दहा हजारांची लाच भोवली : जळगावात कार्यालयातच आवळल्या मुसक्या
जळगाव : मत्स्य विभागाच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तासह कनिष्ठ लिपिकाला दहा हजारांची लाच घेताना कार्यालयातच अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी दिड वाजता जळगाव एसीबीच्या पथकाने मत्स्य व्यवसाय कार्यालयात ही कारवाई केली. प्रभारी सहाय्यक रमेशकुमार जगन्नाथ धाडीले (नाशिक) व कनिष्ठ लिपिक रणजीत हरी नाईक (49, जळगाव) असे अटकेतील संशयीत आरोपीचे नाव आहे.
कार्यालयातच स्वीकारली लाच
जळगाव जिल्ह्यातील 37 वर्षीय तक्रारदाराचा मत्स्य व्यवसाय आहे. त्यांनी वाघुर धरणावर पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनाचे कंत्राट घेतले असून या व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून उत्कृष्ट अहवाल देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे आरोपींनी 24 रोजी लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. बुधवारी दुपारी दिड वाजता आरोपी धाडीले यांनी पंचांसमक्ष कार्यालयातच लाच स्वीकारताच प्रभारी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार जगनाथ धाडीले (55, मुकूंद अपार्टमेंट, फ्लॅट नं.6, शिखरेवाडी, नाशिक) व कनिष्ठ लिपिक रणजीत हरी नाईक, (49, रा.प्लॉट नं.29, रायसोनी नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, हवालदार सुरेश पाटील, नाईक मनोज जोशी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.