रावेरात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले
रावेर- अवैध वाळू करणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह महसूल विभागाने पकडल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्यांच्या गोटात धडकी भरली आहे. संबंधितांवर सुमारे चार लाख रुपयांपर्यंत दंड होणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंगळवारी दुपारी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूलच्या विभागाच्या पथकाला मिळाल्याने कारवाई करण्यात आली. त्यात रावेर येथील विकास रतीराम घेटे यांच्या मालकीचे या ट्रॅक्टर-ट्रॉली (क्रमांक एम.एच.19 ए.एन. 1501) हे केर्हाळा गावाकडून रसलपूर जाताना पकडण्यात आले तर धनराज भीमराव बघाडे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर-ट्रॉली (क्रमांक एम.एच.19 ए.एम.1590) देखील याच रस्त्यावर पकडण्यात आले शिवाय अटवाळे येथील नितीन आत्माराम धनगर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर-ट्रॉली (क्रमांक एम.एच.19 बी.जी.3080) ला भोकरीकडून केर्हाळा जाताना पकडण्यात आले. ही कारवाई नायब तहसीलदार संजय तायडे, मंडळाधिकारी संदीप जैस्वाल, तलाठी दादाराव कांबळे, यासीन तडवी, शैलेश झोटे यांच्या टीमने केली. दरम्यान, कारवाईच्या धाकाने आता वाळू वाहतूक मध्यरात्री वाहतूककरीकत आहेत. केर्हाळा-रसलपूर व्हाया शिवाजी चौक, रावेर मार्गाचा जास्त वापर होत असून निंभोरासीम भागातदेखील अशीच धडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.