क्रुझर-ट्रकच्या धडकेत दोन ठार


नाशिक- नाशिक रोडवरील राशेगाव शिवारात क्रुझर आणि आयशर ट्रक या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना शुक्रवारी (ता. 2) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. क्रुझरचा चालक बाळू शंकर गांगुर्डे (वय 26, रा. पेठ) जागीच ठार झाला, तर कल्पेश दत्तात्रेय बोरसे (35, रा. पावरापाडा, नाचलोंडी, ता. पेठ) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींमध्ये नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले आणि पेठ तालुक्यामध्ये कार्यरत असलेले शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ येथे कार्यरत असलेले व रोज पेठ-नाशिक प्रवास करणारे कर्मचारी नेहमीप्रमाणे नाशिककडे येण्यासाठी निघाले होते. खासगी क्रुझर (एमएच 04/डीबी 3344) वाहनातून ते नाशिककडे येत असताना मालवाहू आयशरने (एमएच 14/एचजी 3666) क्रुझरला धडक दिली. राशेगावजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास पूल ओलांडल्यानंतर समोरून भरधाव आलेल्या मालवाहू आयशरने (एमएच 14/एचजी 3666) क्रुझरला धडक दिली. या धडकेमुळे क्रुझर चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर आयशर ट्रकवर जाऊन आदळली. अपघातात क्रुझरचा चक्काचूर झाला. यात आयशर ट्रकदेखील उलटला. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी भरपावसात बचावकार्य हाती घेतले. दिंडोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, के. के. शिरसाठ, एच. सी. गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. खासगी वाहने, तसेच 108 अ‍ॅम्बुलन्समधून जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. क्रुझरचा चालक गांगुर्डे जागीच ठार झाला. तर बोरसेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

अपघातात हे झाले जखमी
अमित भुसावरे (सहाय्यक गटविकास अधिकारी), डॉ. योगिता पगार (30), पुष्पा अरविंद गीत (55, झेडपी शाळा केंद्रप्रमुख), शिवकुमार पाल (26), शिवाजी मल्हार शिंदे (42), अभिजित सूर्यवंशी (27, रा. औरंगाबाद), आर्थर जबारण (61), संजू बाबूराव गांगुर्डे (40, रा. शेवरी, दिंडोरी), योगेश गणपत गायकवाड (27, रा. मखमलाबाद, पोलिस कर्मचारी).


कॉपी करू नका.