नवापूरातील खुनाचा उलगडा : सुपारी किलर जाळ्यात


अवैध दारू तस्करीच्या वादातून खून केल्याची आरोपींची कबुली

नंदुरबार : अवैध दारू तस्करीच्या वादातून सुरतच्या व्यावसायीकाचा नवापूरात खून झाल्याची बाब नंदुरबार गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी दोघा सुपारी किलरच्या सुरतमधून मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले. भावेशभाई सी.मेहता (रा.घनश्यामभाई सोसायटी, सुरत गुजरात) या व्यापार्‍याच्या खून प्रकरणी आकाश रमेशभाई जोरेवार (21, रा. आंबेडकर नगर, सुरत) व आकाश अरविंदभाई ओड (28, रा.अंबिका नगर, सुरत) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

खून करून मृतदेह गाडीत टाकला
17 जून 2021 रोजी नवापूर येथे धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर एक गुजरात पासिंगच्या कारमधून अनोळखी इसमाचा खून झालेला मृतदेह आढळला होता. खुनाची माहिती मिळताच.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उप-विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. मयताच्या खिशात ऑनलाईन जेवणाची ऑर्डर दिल्याची पावती होती व त्या पावतीवर त्याचा मोबाईल असल्याने यावरुन मयता भावेशभाई सी.मेहता (रा.घनश्यामभाई सोसायटी, सुरत गुजरात) यांची ओळख पटली होती.






सीसीटीव्हीवरून आरोपींची पटली ओळख
मयताचे मारेकरी शोधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व हॉटेल, लॉजेस, पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आले. त्यात 16 जून 2021 रोजी नवापूर शहरातील हॉटेल कुणाल येथे मयत व त्यासोबत इतर 5 ते 6 इसम हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना दिसले तसेच घटनेच्या दिवशी नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल उरविशा येथे देखील ते 5 ते 6 संशयीत दिसून आल्याने आरोपी निश्चीत झाले. मयत हा सुरत येथील असल्याने व मिळालेल्याय सी.सी.टी.व्ही. फुटेजवरुन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एक पथक तत्काळ सुरत येथे रवाना करुन स्वत: गुन्ह्याबाबत वेळोवेळी माहिती घेतली.

सुरतमधून आवळल्या मुसक्या
नंदुरबार पोलीस पथकाने सुरतसारख्या शहरात बातमीदार तयार करुन सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसत असलेले संशयीत हे सुरत, नवसारी येथे दारुची अवैध तस्करी करणारे व पैसे घेवुन गुन्हा करणारे (सुपारी किलर) असल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळवली. त्यावरुन आरोपीतांचा शोध घेण्यात येत होता. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नंदुरबार पोलीसांचे अजुन एक पथक तयार करून नवसारी गुजरात राज्यात रवाना केले. सुरत येथील पथकाने सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसत असलेला एक आरोपीचे घर शोधुन काढले. पथकाने संशयीत आरोपीच्या घराच्या आजु-बाजुला सलग चार दिवस वेषांतर करून पाळत ठेवली. 19 जून 2021 रोजी आकाश रमेशभाई जोरेवार (21, रा.आंबेडकर नगर, सुरत) या आरोपीला बेड्या ठोकण्यात आलया. त्यास खूनाबाबत अधिक विचारले असता त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली तसेच मयताचा अवैध दारू तस्करीच्या व्यवसायातील वादातुन खून केला असल्याची कबुली दिली. दुसरा संशयीत आकाश अरविंदभाई ओड (28, रा.अंबिका नगर, सुरत) यास देखील अटक करण्यात आली तर अन्य संशयीतांचा शोध सुरू आहे. आले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी, नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहा.पोलीस निरीक्षक धिरज महाजन, संदीप पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी, प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश वसावे, विशाल नागरे, जितेंद्र ठाकुर, दादाभाई मासुळ, राकेश मोरे, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे पोलीस अंमलदार राजेंद्र काटके यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !