अकरावी प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा
भुसावळ : शिक्षण उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परीषद जळगाव, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक संघटना अनुदानीत व विनाअनुदानीत संघटनेच्या मदतीने इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने करावी व शासनाने निर्गमित केलेल्या शासकीय परीपत्रकाला अनुसरून प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले.
यांच्या उपस्थितीत उद्घाटन
उद्घाटन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, सहा.शिक्षण उपसंचालक पुष्पलता पाटील, जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, जळगाव माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील सहायक शिक्षण उपनिरीक्षक दीपाली पाटील, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सचिव प्रा.शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यशाळेची प्रस्तावना जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दीपाली पाटील यांनी केले.


27 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर
2020-2021 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता अकरावीच्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेला प्रवेश देत असताना प्रत्येक विद्यालयाने सर्वप्रथम 20 ऑगस्टपासून प्रवेश आवेदन पत्र स्वीकारावेत व शुक्रवार, 27 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर करावी त्यानंतर प्रतीक्षा यादी तयार कराव्यात. प्रवेश देताना मागेल त्याला शिक्षण यानुसार किमान विज्ञान विषयात 35 टक्के गुण असणारा विद्यार्थी हा विज्ञान शाखेत पात्र असेल असे सांगण्यात आले. तसेच दहावी उत्तीर्ण होणारा प्रत्येक विद्यार्थी हा प्रवेशासाठी पात्र असेल तसेच एटीकेटीसाठी प्रवेश देताना शासन निर्णयांचे अनुपालन करण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या. या कार्यशाळेस जवळपास 210 वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष ऑनलाइन सहभाग नोंदवला. अनुदानित विनाअनुदानित तुकड्यांना प्रवेश देताना विद्यालयाच्या शिक्षक-पालक संघामध्ये ठरवून दिलेल्या नुसारच फी आकारण्यात यावी, असे सांगण्यात आले. ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी जुनियर कॉलेज संघटनेचे व विनाअनुदानित संघटनेचे प्रा.योगेश पाटील, प्रा.सतीश पाटील यांनी सहकार्य केले. आभार प्रा.सुनील गरुड यांनी मानले.


