यावल तालुक्यातील ड्रोनद्वारे 64 गावातील मूळ गावठाणचा होणार सर्वे

मिळकतीच्या निश्चितीनंतर सीमा होणार निश्चित ; गावठाण क्षेत्राचाच सर्वे होणार
यावल- तालुक्यात लवकरच ड्रोनद्वारे 64 गावांच्या मूळ गावठाणाचा सर्वे केला जाणार आहे. यात यापूर्वी सिटी सर्वे विभागात अर्थात भूमिअभिलेख विभागात नोंदीत नसलेल्या 64 गावांची या उपक्रमातून मिळकतीची नोंद घेतली जाणार आहे. स्वातंत्र्यपूर्व व नंतर प्रथमच अशा प्रकारे भूमी अभिलेख विभागाकडून मोठा सर्वे होणार आहे. तत्पुर्वी याच्या नियोजनार्थ विभागामार्फत पंचायत समिती व महसूल विभागाची संयुक्त बैठक घेवून आराखडा तयार केला जाणार आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व 84 गाव भूमी अभिलेख विभागाच्या पटलावर नोंदले जाऊन नागरीकांना विविध प्रकारचा त्यातून फायदा होणार आहे.
प्रशासनाकडे केवळ 25 गावठाणचे नकाशे उपलब्ध
यावल तालुक्यात एकुण 84 गाव व दोन शहर आहेत त्यात स्वातंत्र्यपूर्व व नंतर भुमी अभिलेख विभागाकडून दोन्ही शहर व तालुक्यातील केवळ 25 गावांचे गावठाण क्षेत्रातील नकाशे व नागरीकांच्या मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या होत्या. तालुक्यातील उर्वरीत गावांची सिटी सर्वेत नोंदच नव्हती मोजक्याच गावातील नोंदी असल्याने इतर गावाच्या नागरीकांना मिळकत पत्रिका, जागेचे नकाशेे, शासनाच्या भुखंडाचे प्रत्यक्ष क्षेत्र, त्या-त्या गावातील गावठाण क्षेत्र आदींबाबतचा उलगडा होत नव्हता. शासनालादेखील कर आकारणी व बांधकाम परवानगी आदींचे येणार्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत होते तसेच नागरीकांनादेखील संबंधीत जागेवर कर्ज सह त्यांचे मुल्ल्यांकन करणे जिकीरीचे ठरत होते. शासनाकडूनच तालुक्यातील उर्वरीत भूमी अभिलेख कक्षेत नोंद नसलेल्या एकूण 64 गावांचा आता सर्वे करण्याचा निर्णय झाला असून हा सर्वे थेट शासनाकडूनचं एका उपलब्ध होणार्या ‘ड्रोन’ व्दारे केला जाणार आहे. यासाठी लवकरच भूमी अभिलेख विभाग, पंचायत समिती विभाग आणी महसुल विभागाची या सर्वे कार्यक्रमा करीता संयुक्त रित्या बैठक घेण्यात येणार आहे. व त्या नंतर प्रत्यक्ष गावनिहाय सर्वेला ड्रोनव्दारे सुरवात केली जाईल.
एकूण गाव, पाडे, वन गाव, सामील गाव 117
तालुक्यात एकुण पंचायत समितीत ग्रामपंचायत क्षेत्र गावठाण असेलली गावं 84 आहे. तर वन जमिनीवर सहा गाव, गावठाण नसलेली सामील गाव 22 आहे तर पाच पाडे सातपुड्यात असून एकूण 117 गावे आहेेत. प्राथमिक टप्प्यात तालुक्यातील ग्रामीण भागातील जे 64 गावे आहेत. त्यांचा सर्वे तोदेखील पूर्वीच्या गावठाण क्षेत्राचाच होणार आहे त्यात नव्याने विस्तारीत परीसराचा सर्वे होणार नाही तसेच यावल व फैजपूर शहरातील विस्तारीत भागाचा देखील सर्वे होणार नसल्याची माहिती यावल भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अविनाश जगताप यांनी दिली.
असे होणार सर्वेनंतर फायदे
नागरीकांच्या प्रॉपर्टीच्या (मिळकतीचा) नकाशा तयार झाल्यानंतर सीमा निश्चित होतील, मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल, मालकी हक्काची मिळकत पत्रिका तयार होईल तसेच गावातील रस्ते, खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होतील व अतिक्रमण रोखता येईल, मिळकत पत्रिका झाल्यानंतर घरावर कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. ग्रामपंचायत कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलनासाठी भूमी अभिलेख नकाशा उपलब्ध होत शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होणार असल्याचे सूत्र म्हणाले.


