मुक्ताईनगरात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटलांसह विनोद तराळांची माघार

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी अखेच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतल्याने खळबळ उडाली आहे तर त्यांच्यासोबत विनोद तराळांनीदेखील माघार घेतल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपतर्फे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कन्या अॅड.रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष अर्ज भरल्याने उभयंतांमध्ये सरळ लढत होणार आहे. दरम्यान, मागील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांना आव्हान दिले होते, त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता.
अजित पवारांच्या सांगण्यावरून उमेदवारी घेतली मागे
जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दूरध्वनी करून माघार घेण्याबाबत कळवल्याने आम्ही माघार घेतली. मंगळवारी आम्ही विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक आपापल्या पदांचे राजीनामे सादर करणार आहोत, असे अॅड.रवींद्र भैय्या पाटील म्हणाले.

अखेरच्या क्षणी पाच जणांची माघार
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर विधानसभेच्या आखाड्यात माघारीच्या अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे विनोद तराळ यांनी भरलेला पक्षातर्फे तसेच अपक्ष अर्ज मागे घेतला शिवाय वंचितचे उमेदवार नितीन कांडेलकर, अपक्ष उमेदवार अरुण गंगतीरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
रींगणातील उमेदवार व मिळालेले पक्ष चिन्ह असे
मुक्ताईनगराच्या आखाड्यात आता भाजपातर्फे अॅड.रोहिणी खडसे (कमळ), राहुल अशोक पाटील (गॅस सिलिंडर), संजय कडू इंगळे (खाट), चंद्रकांत पाटील (ट्रॅक्टर), ज्योती पाटील (स्पॉयलर), संजय कांडेलकर (कपबशी), भगवान दामू इंगळे (हत्ती) हे सात उमेदवार रींगणात आहेत. भाजपाच्या अॅड.रोहिणी खडसे व शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात सरळ लढत रंगणार आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहण्याची शक्यता आहे.