भुसावळ हत्याकांड : दोन पिस्टलसह चाकू जप्त -पोलिस अधीक्षक


विशेष महानिरीक्षकांची भेट : प्रसिद्धी माध्यमांशी बोलणे टाळले

भुसावळ : पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले म्हणाले की, घटनास्थळावरून दोन पिस्टल दोन चाकू जप्त करण्यात आले आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची कुठलीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही. पोलिसांकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याने अधिक काही सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी सोमवारी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली मात्र प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.

हल्ला करताना आरोपीही जखमी
गुन्ह्यातील तीनही आरोपी गोळीबार करताना तसेच चाकू व चॉपरचा वापर करताना जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आरोपीच्या हातांना जखमा झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.









समता नगर परीसरात बंदोबस्त वाढवला
या घटनेच्या अनुषंगाने समता नगर परीसरात पोलिसांनी आरसीपीसह जिल्ह्यावरून कुमक मागवून बंदोबस्त वाढवला आहे. रात्री घटनास्थळाची जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर अधीक्षकांनी पाहणी केली. फॉरेेन्सिक तज्ज्ञांनी ठसे तसेच छायाचित्रे घेतली. आरोपींनी खूनासाठी वापरलेला चाकू तसेच तसेच पवार यांच्या घरात पडलेला गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

तासाभरात आरोपी जाळ्यात
खुनानंतर पोलिस दलात खळबळ उडाली असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम व पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे त्यांनी शेखर उर्फ राजा हिरालाल मोघे, राजा बॉक्सर मोहसीन उर्फ अजगर खान व मयूर सुरवाडे या आरोपींच्या तासाभरात मुसक्या आवळत त्यांना जळगावात हलवले. आरोपींनी नेमका खून का व कोणत्या कारणासाठी केला? याची माहिती मात्र उपलब्ध होवू शकली नाही. आरोपी अटकेच्या वृत्ताला पोलिस सूत्रांनी दुजोरा दिला.

आई, मुलासह तिघे जखमी : तिघांविरुद्ध गुन्हा
हल्ल्यात मृत नगरसेवक रवींद्र खरात यांच्या पत्नी रजनी खरात यांच्या डोक्याला मार लागला असून मृत नगरसेवक खरात यांचा मुलगा हंसराज रवींद्र खरात यांच्या पाठिला गोळी चाटून गेली असून सुरज सपकाळे यांच्या कानाला स्पर्श करून गोळी गेल्याने तेदेखील जखमी झाल्याने त्यांच्यावर जळगावात उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास मृत नगरसेवक खरात यांचा मुलगा हंसराज रवींद्र खरात (20) यांच्या फिर्यादीनुसार राजा बॉक्सर, राजा मोघे व मयूरेश सुरवाडे (भुसावळ) यांच्याविरुद्ध सोमवारी पहाटे साडेसात वाजता शहर पोलिस ठाण्यात भादंवि 302,307, 34 व आर्म अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !