जळगावात गुन्ह्यापासून बचावासाठी आरोपीची अजब शक्कल : एकावर एक घातले सहा टी शर्ट

जळगाव : गुन्हा केल्यानंतर पोलिसांच्या तावडीत न सापडण्यासाठी आरोपी विविध क्लुप्त्या वापरतात मात्र चाणाक्ष पोलिसांच्या नजरेत ते एक ना एक दिवशी अडकतात हा आजवरचा अनुभव. असाच काहीसा प्रकार जळगावातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. गुन्हा केल्यानंतर पोलिस किंवा सीसीटीव्हीच्या नजरेतून बचाव करण्यासाठी एका गुन्हेगाराने एकावर एक असे सहा टी शर्ट परीधान केले मात्र रविवारी मध्यरात्री संशयीतरीत्या फिरताना उमेश उर्फ मायकल कन्हैय्या नेतले (25, रा.कंजरवाडा) या संशयीताला ताब्यात घेवून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. उमेश उर्फ मायकल कन्हैय्या नेतले हा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. रविवारी मध्यरात्री तो सहा टी शर्ट परीधान पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयीतरीत्या फिरत होता. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्यासह पथकाने त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याने सहा शर्ट परीधान केल्याचे उघड झाले. गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने ही क्लुप्ती लढवल्याचे सूत्रांनी सांगितले.