जळगावात बेकायदेशीर महाविद्यालय : दोघा संचालकांविरुद्ध गुन्हा


जळगाव : भास्कर मार्केटमध्ये मोशन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचे बेकायदेशीर महाविद्यालय स्थापन करीत विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चेतन गुणवंत पाटील (28, रा.भुसावळ) या विद्यार्थ्यांने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर कामकाज होऊन न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या संचालिका शैलजा नितीन पाटील व नितीन पंढरीनाथ पाटील यांच्यासह अन्यदोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

फसवणुकीनंतर उच्च न्यायालयात धाव
चेतन याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने 18 मार्च 2017 रोजी या महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालय एआयसीटीईशी संलग्न असल्याचे संचालिका पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते. यानंतर चेतन याने वेळोवेळी करुन एकूण 1 लाख 95 हजार रूपये फी भरली. महाविद्यालयाचे लेक्चर चिंचोली येथील पी.ई.तात्या पाटील इन्स्टिट्यूट येथे होत असल्याने चेतनसह त्याचे मित्रांना संशय आला. यानंतर पहिल्या सेमिस्टरची परीक्षेच्या निकालानंतर जे गुणपत्रक मिळाले त्यावर एआयसीटीईचा शिक्का नव्हता. विद्यार्थ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी नंतर पालकांसह संचालिका पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. तसेच जीवेठार मारण्याचीही धमकी दिली. यानंतर चेतन याने एआयसीटीई, पोलिसांकडे तक्रार केली. एआयसीटीईकडे माहितीच्या अधिकारातून अर्ज करुन माहिती मिळवली होती. एआयसीटीईने हे महाविद्यालय संलग्न नसल्याचे विद्यार्थ्यांना कळवले होते. तसेच विद्यार्थ्यांची फि, कागदपत्रे परत करण्याचेही आदेश केले होते. तरी देखील विद्यार्थ्यांचे पैसे, कागदपत्र दिले नाही. अखेर चेतन याने उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !