भुसावळात माघारीनंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप

डॉ.मधू मानवतकर यांची माघारी रोखण्यात माजी आमदार संतोष चौधरी यशस्वी : 12 उमेदवार रींगणात : अपक्षांमुळे निवडणुकीत येणार रंगत
भुसावळ : भुसावळातील निवडणूक आखाड्यात माघारीच्या दिवशी कोण-कोण दिग्गज माघार घेतात याकडे मतदार संघासह जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते.त्यानुसार सोमवारी नाट्यमय घडामोडीनंतर अखेरच्या क्षणी एआयएम या राजकीय पक्षाचे रवींद्र बळीराम सपकाळे यांच्यासह नऊ उमेदवारांनी माघार घेतली. अपक्ष उमेदवार डॉ.मधू राजेश मानवतकर या माघारीच्या तयारीत असताना माजी आमदार संतोष चौधरी यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत मन वळवत यशस्वी झाल्याने त्या तहसीलमधून घरी परतल्या व त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धारही केला. भुसावळ विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीसाठी एकुण 21 उमेदवारांनी नामाकंन पत्र दाखल केले होते. यामध्ये आठ राजकीय पक्षाच्या तर 13 अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. यातील कोण उमेदवार माघार घेतो याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. त्यानुसार सोमवारी माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडीतून एआयएमचे उमेदवार रवींद्र बळीराम सपकाळे यांची उमेदवारी माघार घेण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार जगन सोनवणे यांना यश आले. वरणगावचे नगरसेवक विष्णु नेमीचंद खोले, जानकीराम प्रल्हाद सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे, प्रतिभा अशोक शिरसाठ, राजेंद्र केशव सपकाळे, राजेश रमेशा इंगळे, सुरेश धाकुजी भोसले, संजय पंडित ब्राम्हणे या अपक्षांनी माघार घेतली. भुसावळ विधानसभेच्या आखाड्यात 12 उमेदवार रींगणात असून सात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह पाच अपक्षांचा समावेश आहे. यामुळे ही विधानसभा निवडणूक चुरशी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
निवडणूक रींगणातील उमेदवार व त्यांना मिळालेले चिन्ह असे
जगन देवराम सोनवणे (राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी, निशाणी- घड्याळ), निलेश अमृत सुरळकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, निशाणी – रेल्वे इंजिन), राकेश साहेबराव वाकडे (बहुजन समाज पार्टी , निशाणी-हत्ती), संजय वामन सावकारे (भारतीय जनता पार्टी, निशाणी- कमळ), अजय जीवराम इंगळे (बहुजन मुक्ती पार्टी, निशाणी- खाट), कैलास गोपाळ घुले (इंडीयन मुस्लीम लिग, निशाणी- कपबशी), सुनील दादा सुरवाडे (वंचित बहुजन आघाडी, निशाणी- गॅस सिलिंड) तर अपक्ष म्हणून गीता प्रशांत खाचणे (निशाणी- हेलीकॉप्टर), निलेश राजू देवघाटोळे (निशाणी- फूटबॉल), डॉ.मधू राजेश मानवतकर (निशाणी- स्टेथोस्कोप), यमुना दगडू रोटे (निशाणी- ऑटोरीक्शा), सतीश भिका घुले (निशाणी- दुरदर्शन) असे एकूण 12 उमेदवार निवडणूक रींगणा त आहेत. सर्वांनी निशाणी मिळताच प्रचाराचा शुभारंभ करण्यास सुरूवात केली आहे तर मतदारांचेही या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

डॉ.मधू मानवतकर यांचे मन वळवण्यात चौधरी यशस्वी
अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांच्या माघारीसाठी दबाव तंत्राचा वापर सुरू असतानाच त्यांना माघारीसाठी तयार करण्यात आले तर सोमवारी दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या दालनापर्यंत आणण्यात आले मात्र आधीच निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या दालनात एका उमेदवाराच्या माघारीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांना बाहेर उभे रहावे लागले. याची कुणकुण भुसावळ नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते उल्हास पगारे यांना लागताच त्यांनी या ठिकाणी धाव घेवून डॉ.मधू मानवतकर यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले. यामुळे विरोधी राजकीय पक्षाने रचलेला कट उधळून लावण्यात माजी आमदार संतोष चौधरी यशस्वी झाले. माजी आमदार संतोष चौधरी यांनी रविवारीच अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांना कार्यकर्त्यांच्या संमतीने पाठींबा दर्शविला असून त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे.
माघारीसाठी नव्हे तर निशाणी पाहण्यासाठी आले होते दाम्पत्य
माजी आमदार संतोष चौधरी यांनी भूमिका मांडताना सांगितले की, डॉ.मानवतकर दाम्पत्य यांच्यावर माघारीसाठी दबाव होता मात्र ते दबावाला जुमानले नाहीत, ते अधिकृतरीत्या आता रींगणातील उमेदवार असून आपला त्यांना जाहिर पाठिंबा आहे.
निवडणूक नियम पाळण्याचे आवाहन
माघारीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी सर्व उमेदवारांची बैठक घेवून त्यांना बुधवारी चिन्हांचे वाटप केले. आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने तिचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही केले. आचारसंहितेचे उल्लंघण होत असल्यास निवडणूक कक्षातील 9423701478 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.