आधी म्हणाले महाआघाडीचे सरकार येणार नंतर म्हणाले महायुतीचेच सरकार येणार !

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या विधानाने राज्यभरात तर्क-वितर्कांना उधाण
रावेर : नेहमीच धक्कातंत्राचा वापर करून सरकारला घरचा अहेर देणार्या नाथाभाऊंनी विजयादशमीच्या मुहूर्तावर रावेर येथे प्रचार नारळ वाढवताना आगामी सरकार महाआघाडीचेच येणार, असे सूतोवाच करताच त्यांच्या चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी महाआघाडी नव्हे महायुतीचेच सरकार येणार, अशी स्पष्टोक्ती दिली. खडसेंच्या या विधानाचे मात्र सर्वत्र पडसाद उमटले. नाथाभाऊंला पाडण्यासाठी आघाड्या, बिघाड्या सुरू असल्याने महाआघाडी चुकून तोंडात आल्याचे स्पष्टीकरणही खडसेंनी दिले.
नाथाभाऊ अभिमन्यू नव्हे तर अर्जुनच
महाभारताचाही पहिला अध्यायही आटोपला असून खडसे आता भाजपात असून आता सब मिलके आओ और नाथाभाऊंको गिराओ.. म्हणून आघाड्या-बिघाड्या सुरू आहेत. अरे हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणं चांगले जाणतो. तो कधी अडकणार नाही. मिल गया तो मिल गया नही तो छोड दिया… तीर लगा तो ठीक है.. नही तो कमान अपने पास है… असा विरोधकांचा समाचार घेत, सर्व समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी आपण लढा देत असल्याचे ते म्हणाले. कोण्या एका समाजाच्या नेतृत्वासाठी आपण लढत देत नसल्याची कोपरखळी त्यांनी हाणली. आदिवासी, दलित अल्पसंख्यांक, बहुजन, तळागाळातील शेवटच्या घटकातील दीनदुबळ्यांसाठी पोटच्या मुलासारखी आम्ही सेवा केली आहे म्हणून आम्हाला आपल्याकडे हक्काचे मतदान मागण्याचा अधिकार आहे. आणि तो आम्ही हक्काने मिळवणारच, असा दावाही एकनाथराव खडसे यांनी केला.