दिवाळी होणार धामधूमीत : उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्रीवरील बंदी उठवली
नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री करण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदी लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निर्देश दिल्याने फटाके विक्री करणार्या व्यावसायीकांमध्ये नाराजी पसरली होती. भुजबळ यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी थेट संवाद साधून फटाके बंदीचा निर्णय मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला.
काय होते आयुक्तांचे पत्र
उत्तर महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकांनी 15 ऑक्टोंबरच्या आधी फटके बंदीचा ठराव मंजूर करावा तसेच 22 ऑक्टोबरपर्यंत त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध होणे आवश्यक असल्याचं आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले होते. विभागीय आयुक्तांनी शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचा संदर्भ देत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके बंदीचा ठराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझी वसुंधरा अभियानाच्या दुसर्या टप्प्याचे प्रारूप टूलकीटनुसार फटाके बंदीसाठी पुढाकार घेण्यात आला असून, पर्यावरण संवर्धन व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शंभर गुण देण्यात आले आहेत. दिवाळीत फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात शहरी भागात अधिक प्रमाण असल्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्याच्या दृष्टीने ठराव करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते मात्र या निर्णयामुळे फटाके विक्री करणार्यांसह हिंदूत्ववादी संटघनांमध्ये नाराजी व्यक्त होत होती मात्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री करण्यावरील बंदी उठवण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.





