सत्ता आल्यास शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे : शिवसेना फक्त शिवसैनिकांसमोर आणि मराठी मातीसमोरच झुकते, भाजपाचे नाव घेता लगावला टोला

मुंबई : शिवसेना फक्त शिवसैनिकांसमोर आणि मराठी मातीसमोरच झुकते, असे टोला भाजपाला लगावत शिवसेना उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिराच्या मुद्द्यावर जाहीरपणे काही बोलू नये, असे पंतप्रधान मोदी यांनी सुचवले आहे, हरकत नाही. सुप्रीम कोर्ट लवकरच न्याय देईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा संसदेने कायदा करून अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी अपेक्षा करीत भाजपशी शिवसेना झुकली या आरोपांचा त्यांनी इन्कार केला. मंगळवारी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडला. युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर दहा रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बससेवा सुरू केली जाईल तसेच 300 युनिटपर्यंतचा वीजदर 30 टक्के कमी केला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

देशातील मुस्लीम समाज आमच्यासोबत आल्यास त्यांनाही न्याय देणार
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले तसेच धनगर समाजालाही मिळवून देणार आहोत शिवाय या देशाचे मुसलमान जरी आमच्यासोबत आले तरी आम्ही त्यांना न्याय-हक्क मिळवून देऊ, असे सांगत पहिल्यांदाच मुस्लिमांना चुचकारले. सत्ता आल्यास शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यातील तमाम शिवसैनिकांनी अत्यंत प्रामाणिकपणे युतीचा भगवा फडकविण्यासाठी काम करावे आणि आज दसरा साजरा करतो आहोत तसाच तो 24 तारखेलाही साजरा करावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. कलम 370 रद्द करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले. आता अमित शहा यांनी बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर घालवावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.








अजित पवारांचे अश्रू मगरीचे
अजित पवार परवा रडले. मगरीला रडताना मी बघितले नव्हते पण ते कसे असते, हे कळले. राजकारणाचा दर्जा खालावला, असे ते म्हणाले. आमच्याकडे पाणी नाही म्हणून लोक डोळ्यात पाणी आणून तुमच्याकडे यायचे तेव्हा तुम्ही त्यांना कोणते पाणी दाखवले? आता तुमच्या डोळ्यात तुमच्या कर्माने अश्रू आले आहेत, असा टोला त्यांनी हाणला.

सुडाने चौकशी लावणार असाल तर चिरडून टाकू : भाजपला इशारा
शरद पवार यांच्यावर ईडीची कारवाई केली म्हणून मी हे बोलत नाही पण ईडी कोणतीही कारवाई सुडाने करणार असेल तर आम्ही मोडून, चिरडून ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रातील भाजप सरकारला दिला. आज ईडीवर सुडाचा आरोप करणारे शरद पवार आहेत मग सन 2000 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध यांच्या सरकारने कोणत्या भावनेतून कारवाई केली होती, या शब्दात त्यांनी पवार यांच्यावरही हल्ला चढवला. शरद पवार आणि काँग्रेस यांचे टार्गेट जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ते आमचे टार्गेट राहणारच, असेही ते म्हणाले.

तिकीट न मिळालेल्या शिवसैनिकांची मागितली माफी
राज्याच्या हितासाठी आणि हिंदुत्वासाठी भाजपबरोबर मला युती करावी लागली. सर्वच इच्छुकांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही. कारण त्या जागा आम्हाला सुटल्या नाहीत, अशा शिवसैनिकांची मी जाहीरपणे माफी मागतो. पण आता पाठीत खंजीर खुपसण्याचे राजकारण करू नका. आम्ही ही मैत्री करतो ती मनापासूनच, अशी भावनिक साधनद त्यांनी शिवसैनिकांना घातली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !