भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी जाळ्यात

बाजारपेठ पोलिसांची कामगिरी :जंक्शन बनले शस्त्र तस्करीचे केंद्र
भुसावळ : शहरात एकाच दिवशी पूर्व वैमनस्यावरून पाच जणांची निर्घृण हत्या झाल्यानंतर पोलिस प्रशासन अलर्ट झाले असून शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासह नाकाबंदी तसेच कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. मंगळवारी रात्री 12 वाजेनंतर नाहाटा चौफुलीजवळ कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एका संशयीताकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. रमाकांत वेडू वाघ (42, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
शहरात झालेल्या गँगवारनंतर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहिम सुरू केली आहे. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड तसेच बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रात्री 12 वाजेनंतर नाहाटा चौफुलीवर कोम्बिंग व नाकाबंदी करून संशयीत आरोपी रमाकांत वाघच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच 500 रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
ही कारवाई बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक रावसाहेब किर्तीकर, रमण सुरळकर, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव आदींनी केली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.