भुसावळात पुन्हा दोन गावठी कट्टे जप्त

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : एका आरोपीला अटक
भुसावळ : शहरात गावठी कट्टे पकडण्याचे सत्र कायम असून शनिवारी रात्रीदेखील जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक करीत तब्बल दोन कट्टे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. शाकिर उर्फ गोलू सय्यद राशीद (21, रा.32 खोली, स्वामी विवेकानंद शाळेजवळ, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ शहरातील 32 खोली, विवेकानंद शाळेजवळ एक संशयीत गावठी कट्ट्यांसह येणार असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक बी.जी.रोहम यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अशोक महाजन, हवालदार अनिल इंगळे, सुरेश महाजन, सुनील दामोदरे, नाईक संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, चालक व हवालदार इद्रीस पठाण आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीचे दोन कट्टे जप्त केले. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात रात्र उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
