शिक्षक पात्रता घोटाळ्यात सुपेंवर झालेल्या कारवाईने एजंट झाले सावध
टीईटीचे गोळा केलेल्या लाखो रुपयांची लावली विल्हेवाट ?
नंदुरबार : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात राज्य परीक्षा मंडळाचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर कारवाई झाल्याने राज्यभरातील एजंट सावध झाले आहेत. आपल्यावर देखील छापा पडू शकतो, या भीतीने बहुचर्चित एजंटांनी पैशांची विल्हेवाट लावल्याची चर्चा रंगू लागली आहे.
एजंटांची उडाली दाणादाण
शिक्षक पात्रता परीक्षेचा घोटाळा उघडकीस आल्याने पुणे पोलिसांनी आजी-माजी आयुक्तांसह काही हस्तकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत. आयुक्त तुकाराम सुपे यांनी कबुली दिल्यामुळे टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंटांची पार दाणादाण उडाली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरीता एजंटांनी भावी गुरुजींकडून दोन ते तीन लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. राज्यभरातून ही रक्कम गोळा करण्यात आली होती मात्र त्यातच आयुक्त सुपे यांना अटक झाल्याची बातमी पसरल्याने राज्यभरातील एजंट सावध झाले आहेत. परीणामी घरात ठेवलेल्या टीईटी नावाने लाखो रुपये देखील विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना संधी मिळाली असल्याचे बोलले जात आहे. नंदुरबार व शहादा येथील काही एजंटांची नावे समोर येत असल्याने ते समाज माध्यमातून गायब झाल्याची चर्चा आहेत.





