भुसावळ शहरात 12 संवेदनशील मतदान केंद्र


पोलिसांची संवेदनशील मतदान केंद्रावर करडी नजर : रविवारी होणार निवडणूक कर्मचार्‍यांना मतदान यंत्राचे वितरण

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 12 संवेदनशील केंद्र असून या केंद्रावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीतील मतदान प्रक्रिया चोखपणे पार पडण्यासाठी कर्मचारी परीश्रम घेत असून मंगळवारी बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट सिलिंग करण्याचे काम पार पडले. भुसावळ विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यांनी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत प्रचाराचे रणशिंग फुंकले असून प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे निवडणूक शाखेच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेच्या कामाला गती देण्यात आली आहे. मतदारसंघात 312 मतदान केंद्र असून यामध्ये शहरातील 12 मतदान केंद्र संवेदनशील आहेत.

कर्मचार्‍यांना निवडणूक प्रशिक्षण
निवडणूक प्रशासनाच्या माध्यमातून निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जात आहे. अखेरच्या टप्यातील बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट सिलिंग करण्याचे काम सोमवारी आणि मंगळवारी प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात आले. यामध्ये 375 बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट तर 406 व्हीव्हीपॅटचा यंत्राचा समावेश आहे. मतदानाची प्रक्रिया यशस्वी पार पडण्यासाठी किमान 725 कर्मचारी तैनात करण्यात आले असून यामध्ये मुक्ताईनगर, यावल, जामनेर, बोदवड अशा चार तालुक्यातील बीएलओ, ग्रामसेवक, कृषी सहायक व पर्यवेक्षकांचा समावेश आहे. मतदानाच्या सर्व प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक धीवरे हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अशी आहेत संवेदनशील मतदान केंद्र
बाजारपेठ पोलिस ठाणे अंतर्गत भुसावळ हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक- 64, नगरपालिका प्राथमिक शाळा क्रं.35, मतदान केंद्र क्रमांक- 162, ताप्ती पब्लीक स्कूल मतदान केंद्र क्रमांक- 164, हाजी अजीज पहेलवान गर्ल्स प्राथमिक हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक- 123, बी.झेड.उर्दू हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक – 114, भुसावळ नगरपालिका उर्दू हायस्कूल, इमाम वाडा मतदान केंद्र क्रमांक – 65, भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्या मंदीर मतदान केंद्र क्रमांक- 56, नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 35, मतदान केंद्र क्रमांक- 163, श्री.सु.ग.टेमाणी हिंदी गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मतदान केंद्र क्रमांक- 81, श्रीमती सुशीलाबाई किसनलाल अग्रवाल संस्कृत विद्या मंदीर (डी.एल.हिंदी हायस्कूल पटागंण) मतदान केंद्र क्रमांक- 83, संत गाडगेबाबा हिंदी हायस्कूल (डी.एल.हिंदी हायस्कूल पटागंण) मतदान केंद्र क्रमांक- 105 व भुसावळ तालुका पोलिस ठाणे अंतर्गत कुर्‍हे प्र.न.येथील मतदान केंद्र क्रमांक- 274 असे 12 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून या केंद्रावर करडी नजर व चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मतदान प्रक्रियेच्या साहित्याचे रविवारी वितरण
मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी अत्यावश्यक साहित्याचे रविवारी प्रांताधिकारी कार्यालयातून वितरण केले जाणार आहे. यामध्ये व्हिव्हिपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट यासह इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. साहित्य वितरणासाठी प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात सुसज्ज असा भव्य असा मंडप उभारला जात आहे तर रविवारी दिवसभर या भागात निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची वर्दळ राहणार असून कर्मचारी सायंकाळीच आपापल्या ताब्यात मिळालेले साहिहत्य घेवून नियुक्तीच्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून खाजगी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !