चाळीसगावात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण


चाळीसगाव : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे बुधवारी शहरात जय भवानी, जय शिवाजीच्या प्रचंड गजरात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व खासदार छत्रपती संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील शिवाजी महाराज चौकात झालेल्या या देखण्यासाठी हजारांच्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार छत्रपती संभाजीराजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार राजुमामा भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगराध्यक्ष आशलता चव्हाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.








जलयुक्त शिवाराचे खरे प्रणेते छत्रपती शिवरायच : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असून ते केवळ योध्दे तर होतेच त्याबरोबरच त्यांनी आदर्श राज्य कसे चालवावे हे देखील शिकविले शिवाय जलयुक्त शिवाराचे ते खरे प्रणेते असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. चाळीसगाव शहरात बुधवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

रयतेला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखवला
फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून सर्वसामान्य रयतेला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला व राज्य कारभार करण्याचा आदर्श समोर ठेवला. महाराजांनी विविध किल्ल्याच्या माध्यमातून स्वराज्याला भक्कम संरक्षण मिळवून दिले तसेच जलसंवर्धनच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य केले. आमचं पाणी,आमचं जंगल… आमचं वृक्ष…ही आमची संपत्ती आहे त्याशिवाय कोणतेही राज्य संपन्न होऊ शकत नाही त्यामुळे ते जलयुक्त शिवाराचे खरे प्रणेते होते. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रीकरण करण्याचे काम महाराजांनी केले असल्याचे ही फडणवीस म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !