भुसावळातील युवकाची गळफास घेवून आत्महत्या

भुसावळ : शहरातील शिवदत्त नगरातील रहिवासी तथा म्युनिसीपल हायस्कुलचे मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे यांचे चिरंजीव गौरव भानुदास सोनवणे (वय 26) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, 15 रोजी दुपारी 2.40 वाजता राहत्या घरी घडली. या घटनेनंतर या परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र कळू शकले नाही.
मृतदेह पाहताच फोडला टाहो
मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गौरवने फाशी घेतली तर काही वेळानंतर त्याचे वडिल बी.वाय.सोनवणे हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा आतून लावलेला असल्याचे दिसल्याने त्यांनी नागरीकांच्या मदतीने दरवाजा तोडल्यांतर त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच त्यांनी टाहो फोडला. शहरातील एका खाजगी रुग्णालयात गौरवला हलवण्यात आले मात्र तेथे सुविधा नसल्याने नातेवाईकांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबात नशिराबाद पोलिसात वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत जाधव यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. दरम्यान, गौरवचे शिक्षण एमबीए झाल्यानंतर तो मुंबईत नोकरी करीत असल्याचे सांगण्यात आले. गौरव आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. गौरवचे वडिल भुसावळच्या मुन्सीपल हायस्कूलचे मुख्याध्यापक असून आई प्रतिमा पाटील या शिंदीतील श्रीकृष्ण हायस्कूलला मुख्याध्यापिका आहेत तर बहिण येवला येथे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
